एथिकल हॅकर्सना करियर संधी, वाढली मागणी, मिळणार चांगला पगार

कोविड १९ चा परिणाम प्रत्येक उद्योगावर झाला असून त्याला सायबर स्पेस उद्योग सुद्धा अपवाद नाहीत. जगभरात सर्वत्र सायबर हल्ले वाढले असून सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ दिसून येत आहे. यामुळे सरकारी संस्था, अर्थसंस्था, कंपन्या आणि अन्य उद्योग आपापला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी एथिकल हॅकर्सना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या देत आहेत. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम, ‘ग्लोबल सायबर सिक्युरिटी’ आउटलुक रिपोर्ट नुसार २०२१ मध्ये जागतिक स्तरावर सायबर हल्ल्यांचे प्रमाण १२५ टक्के वाढले असून २०२५ पर्यंत सायबर गुन्ह्यांमुळे होणारे नुकसान १०.५ ट्रिलीयन डॉलर्सवर जाऊ शकते.

याचा परिणाम म्हणून सायबर सुरक्षा प्रोफेशनल्सची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातही एथिकल हॅकर्सना अधिक मागणी आहे. हॅकिंग हा गुन्हा मानला जात असला तरी व्हाईट हॅट हॅकर्स म्हणजेच एथिकल हॅकर्स यांनी केलेले काम गुन्हा मानला जात नाही. कारण ते सिस्टीम सुरक्षेतील त्रुटी शोधून काढण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा वापर करत असतात. अनेक सरकारी, बिनसरकारी संस्था, कंपन्या, अर्थ संस्था, उद्योग, डिजिटल सुरक्षा त्रुटी शोधण्यासाठी या हॅकर्सची मदत घेतात आणि आपल्या व्यवसायाचा हॅकर्स पासून बचाव करतात.

एथिकल हॅकर्स त्यांच्या संबंधित संस्था, कंपन्यांच्या पूर्व परवानगीने नेटवर्क हॅक करून त्यातील त्रुटी दूर करतात आणि नेटवर्क अधिक सुरक्षित बनवितात. त्यासाठी त्यांना चांगला पगार दिला जातो. अर्थात हे काम वाटते तितके सोपे नसते. दबावाखाली अनेकदा काम करावे लागते, शिकण्याची जिज्ञासा असावी लागते, विविध ऑपरेटिंग सिस्टीमची माहिती असावी लागते, इंटरनेटची चांगली समज तसेच पायुभूत तंत्र, प्रोग्रामिंग स्कील असावे लागते. या साठी विविध डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस उपयुक्त ठरतात.