IRCTC Scam : तेजस्वी यादव अडचणीत, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची मागणी


नवी दिल्ली : बहुचर्चित IRCTC घोटाळ्यामुळे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने त्याच्याशी संबंधित अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी यादव यांचा जामीन रद्द करण्यासाठी दिल्लीतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

सीबीआयच्या अर्जावर विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी तेजस्वी यादव यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत सीबीआय अधिकाऱ्यांना धमकावले, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, असे सीबीआयने म्हटले आहे.

IRCTC घोटाळा लालू प्रसाद यादव यांच्या रेल्वे मंत्री असतानाचा आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. घोटाळा प्रकरणात लालू यादव यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य आरोपी आहेत. त्यात तेजस्वी यादव यांचाही समावेश आहे. विशेष न्यायालयाने जामीन रद्द केल्यास त्यांचे बिहारचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात येऊ शकते.