आजपासून PM मोदींना मिळालेल्या 1200 हून अधिक भेटवस्तूंचा ई-लिलाव, यादीत या भेटवस्तूंचा समावेश


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून सुरू झाला आहे. आज पीएम मोदींचाही वाढदिवस आहे (PM Modi Birthday). यानिमित्ताने स्मृतीचिन्ह व भेटवस्तू इत्यादींचा ई-लिलाव संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 1200 हून अधिक प्रतिष्ठित आणि संस्मरणीय स्मृतिचिन्हांचा हा ई-लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. सांस्कृतिक मंत्रालय पीएम मोदींच्या भेटवस्तूंचा चौथा ई-लिलाव आयोजित करत आहे.

2019 मध्ये, या वस्तू खुल्या लिलावाद्वारे लोकांसमोर ठेवण्यात आल्या. त्यावेळी लिलावाच्या पहिल्या फेरीत 1805 तर दुसऱ्या फेरीत 2772 भेटवस्तू ठेवण्यात आल्या होत्या. 2021 मध्ये देखील पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव सप्टेंबरमध्ये करण्यात आला होता. त्यावेळी 1348 स्मरणिका इत्यादी वेबसाईटच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. वेबसाइटवर ई-लिलावासाठी ठेवलेल्या स्मृतिचिन्हे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.

काय आहे यादीत ?
पीएम मोदींना मिळालेली नेत्रदीपक चित्रे, शिल्पे, हस्तकला आणि लोक कलाकृतींचा ई-लिलावात समावेश करण्यात आला आहे. पारंपारिक अंगवस्त्र, शाल, पगडी-टोप्या, विधी तलवार इत्यादी यापैकी अनेक वस्तू पारंपारिकपणे पंतप्रधान मोदींना भेट म्हणून देण्यात आल्या. अयोध्येतील श्री राम मंदिर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराचे अनुकरणही इतर आकर्षक स्मरणिकेत समाविष्ट करण्यात आले आहे. पीएम मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव पीएम मेमेंटॉस वेबसाइट pmmementos.gov.in द्वारे केला जात आहे.

पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जन्मलेल्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी
वृत्तानुसार, भाजपच्या तामिळनाडू युनिटने पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या आणि बेबी किट भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 17 सप्टेंबरला जन्मलेल्या मुलांना सोन्याच्या अंगठ्या दिल्या जातील, प्रत्येक अंगठीचे वजन सुमारे दोन ग्रॅम असेल.

असे सांगण्यात येत आहे की केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एल मुरुगन रोयापुरममधील RSRM रुग्णालयात लाभार्थी बाळांना सोन्याच्या अंगठ्या आणि बेबी किट भेट देतील. इतकंच नाही तर एल मुरुगन पंतप्रधान मोदींच्या 72व्या वाढदिवसानिमित्त कोलाथूर विधानसभा मतदारसंघात पीएम मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 750 किलो मासळीचे वाटप करणार आहेत.