पंतप्रधान मोदींच्या या आहेत खास आवडीच्या वस्तू

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशात विविध प्रकारांनी साजरा केला जात असून भाजपने देशभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता अभियान असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. जगातील शक्तिशाली नेत्याच्या यादीत मोदींचे स्थान वरचे आहे आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात देशहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे देशात सुद्धा त्यांच्या प्रशंसकांची संख्या मोठी आहे.

मोदींचा फिटनेस, त्यांचा आहार, योगाभ्यास, दिवसाचे १८ तास काम करण्याची क्षमता, त्यांची शिव आणि देवीमाता भक्ती, नवरात्रातील उपास याविषयी नेहमीच चर्चा होते. पण आपल्या या पंतप्रधानांच्या काही खास आवडी सुद्धा आहेत. मोदींचा पोशाख हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. मोदी वापरत असलेली जॅकेटस आता मोदी जॅकेटस नावानेच ओळखली जातात आणि जगभरातील विविध देशांच्या नेत्यांना या जॅकेटस नी मोहात पाडले आहे. मोदी पोषाखाबाबत नेहमीच दक्ष असतात. सलवार, कुर्ता, सूट, चुडीदार असे विविध प्रकारचे कपडे त्यांच्या विशेष आवडीचे आहेत. अनेकदा खास गमछे त्यांच्या पोशाखात दिसतात.

पोशाखाबरोबरच मोदींना घड्याळाचा विशेष शौक आहे. ते अॅपल किंवा मोवादो ब्रांडचे घड्याळ पसंत करतात. मोदींना चष्म्याचा सुद्धा शौक आहे. ते बुल्गारी ब्रांडचा चष्मा वापरतात असे सांगितले जाते. उन्हाची तीव्रता जशी असेल त्यानुसार ते चष्मा बदलतात. त्यांचे चष्मे हातातून खाली पडले तरी सहजसहजी फुटणारे नसतात असेही म्हणतात. मोदींचा पेनचा शौक असाच नेहमी चर्चेत असतो. लहानपणापासून त्यांना फाऊंटन पेनचा नाद आहे. लहानपणी ते पेन साठवत असत. ते आजही फाऊंटन पेनचाच वापर करतात. माँटब्लॅक नावाच्या कंपनीचे पेन मोदी वापरतात. त्यांची किंमत १ लाख ३० हजार रुपये आहे.

डिजिटल इंडियाचा जोरदार प्रचार करणारे मोदी कोणता फोन वापरतात याची अनेकांना उत्सुकता वाटते. मोदी सॅटलाईट किंवा आरएएक्स म्हणजे रीस्ट्रीक्टेड एरिया एक्स्चेंज फोनचा वापर करतात. हे फोन खास व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी डिझाईन केलेले असतात. त्यामुळे गुप्त संभाषण लिक होण्याचा धोका टाळता येतो.