संघाच्या दसरा कार्यक्रमात प्रथमच महिला मुख्य अतिथी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा कार्यक्रम नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नागपूर येथील संघ मुख्यालयात भव्य समारोह यंदाही होणार असला तरी या वेळचा समारोह खास ऐतिहासिक ठरणार आहे. संघाच्या ९२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच दसरा कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून एका महिलेला निमंत्रित केले गेले असून त्यांचे नाव आहे संतोष यादव. संतोष यादव या गिर्यारोहक आणि पद्मश्रीने सन्मानित आहेत.

नागपूर संघचालक राजेश लोया या संदर्भात माहिती देताना म्हणाले संघ लवकरच शताब्दी साजरी करणार आहे आणि महिला अधिकार बाबत सक्रीय झाला आहे. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात मुख्य भाषण संरसंघचालक मोहन भागवत यांचेच होणार आहे. या दिवशीचे भाषण विशेष महत्वाचे मानले जाते कारण त्यातून संघाच्या भविष्यातील योजना सांगितल्या जातात. आमच्या प्रमुख अतिथी संतोष यादव या पहिल्या महिला आहेत ज्यांनी दोन वेळा एव्हरेस्टला गवसणी घातली आहे. मे १९९२ आणि मे १९९३ अश्या सलग दोन वर्षी त्यांनी एव्हरेस्ट सर केले आहे. २००० साली त्यांना पद्मश्री दिली गेली आहे.

संतोष यादव यांना संघाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रण हे संघाच्या भूमिकेतील बदलाचे लक्षण मानले जात आहे. डॉ. मोहन भागवत यांनी नेहमीच महिलांचा गौरव करताना त्यांची कार्यक्षमता आणि कौशल्य पुरुषांच्या तोडीचे असल्याचे उल्लेख केले आहेत. काही वर्षांपूर्वी नोबेल विजेते कैलास सत्यार्थी आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यानाही संघाने दसरा कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. प्रणव मुखर्जी यांना कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावरून जोरदार टीकेला सामोरे जावे लागले होते.