या मैदानांवर झाडाला बॉल लागल्यास मिळतो चौकार

क्रिकेट जगभरात आवडीने पाहिल्या जाणाऱ्या खेळांपैकी एक आहे. क्रिकेटची अनेक स्टेडीयमस क्रिकेट इतिहासात प्रसिद्धी पावलेली आहेत. प्रत्येक क्रिकेट खेळाडूला लॉर्डस वर तसेच कोलकाता येथील इडन गार्डन मैदानावर निदान एकदा तरी खेळायला मिळावे अशी इच्छा असते. मात्र काही क्रिकेट मैदानावर सीमा रेषेच्या आत झाडे आहेत आणि झाडाला बॉल लागला तर फलंदाजाला चौकार दिला जातो. या मैदानांवर वर्ल्ड कप सामने सुद्धा खेळले गेले आहेत.

द. आफ्रिकेत आयोजित झालेल्या २००३ सालातील वर्ल्ड कप मध्ये असेच एक स्टेडीयम चर्चेत आले होते. पीटरमॅरीटसबर्ग येथील या स्टेडीयमच्या सीमेवर मोठे झाड आहे. या झाडावर बॉल लागला तर चौकार मानला जातो. या मैदानावर दोन आंतरराष्ट्रीय सामने २००३ मध्ये खेळले गेले होते. त्यातला दुसरा सामना भारत आणि नामिबिया यांच्यात झाला होता आणि त्यात सचिन आणि गांगुलीने शतके झळकविली होती. हा सामना भारताने १८१ धावांनी जिंकला होता.

केंट क्रिकेट क्लबचे होम ग्राउंड असलेले सेंट लॉरेन्स मैदान. येथेही सीमा रेषेजवळ एक २०० वर्षे जुने २७ फुटी लेमन ट्री होते.२००५ मध्ये ते पडले तेव्हा त्या जागी नवीन झाड लावले गेले. नेदरलंड मध्ये अॅमस्टॅलविन येथील व्हीआरए क्रिकेट मैदानावर अनेक हायप्रोफाईल वन डे सामने खेळले गेले आहेत.१९९९ मध्ये विश्वकप मधील एक सामना आणि २००४ मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील व्हिडीओकॉन कप स्पर्धा येथे झाल्या. या मैदानात सुद्धा एक भलेमोठे झाड आहे. गेल्या १० वर्षात येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही.