महाराणीच्या अंत्यसंस्कार सुरक्षा व्यवस्थेवर होणार इतका खर्च

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर सोमवारी म्हणजे १९ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यात राजपरिवाराबरोबरच अनेक प्रमुख व्यक्ती सहभागी होणार आहेत. अंत्यसंस्कार सुरक्षा व्यवस्थेवर ब्रिटीश सरकारला ७५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ५९ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहे. हा ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात महाग एक दिवसीय कार्यक्रम ठरेल असेही सांगितले जात आहे.

अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्याच्या सुरक्षेसाठी ब्रिटीश एमआय ५ व एमआय ६ गुप्तचर संस्था, लंडन मेट्रो पोलीटन पोलीस व सिक्रेट सर्विस अधिकारी एकत्र काम करणार आहेत. रॉयल सुरक्षा अधिकारी सायमन मोर्गन यांच्या म्हणण्यानुसार युके पोलिसांची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. २०११ मध्ये प्रिन्स विलियम्स आणि केट मिडलटन यांच्या विवाहाच्या वेळी सर्वाधिक पोलीस फोर्स तैनात होता पण त्याची तुलना राणीच्या अंत्यसंस्कारशी होऊ शकत नाही. विलियम-केट विवाहासाठी पोलीस यंत्रणेवर ७.२ दशलक्ष डॉलर्स खर्च केले गेले होते.

लंडन मधील एकूण सुरक्षा, अंत्यसंस्कार काळात वाढविली गेली असून गर्दीत सुद्धा साध्या वेशातील पोलीस आणि गुप्तचर तैनात केले जात आहेत. लंडन मधील काही भाग पूर्ण बंद केले असून सोमवारी आणखी काही रस्ते बंद केले जाणार आहेत. दहशतवादी गटांवर बारीक नजर ठेवली गेली असून प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांना सुद्धा शाही सुरक्षा पुरविली गेली आहे.