खुनी हल्ल्यातून थोडक्यात बचावले पुतीन

उझबेकिस्तान मध्ये होत असलेल्या एसओएस (शांघाई सहयोग संघटन) बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हजर झाले असतानाच बुधवारी पुतीन यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यातून पुतीन थोडक्यात बचावले असल्याची खबर आली आहे. बुधवारी हा हल्ला झाला असे समजते. त्यानंतर पुतीन उझबेकिस्तानला रवाना झाले आणि आज म्हणजे शुक्रवारी पुतीन आणि मोदी द्विपक्षीय बैठकीत भेटणार आहेत.

जनरल जीव्हीआर टेलिव्हिजन चॅनलने पुतीन त्यांच्यावरील हल्ल्याची बातमी दिली आहे मात्र हल्ला कुठे, कधी झाला याचा खुलासा केलेला नाही. युरो विकली न्यूज रिपोर्ट नुसार पुतीन यांच्या वाहनांचा ताफा जात असताना रस्त्यात मधेच एक अडथळा होता आणि पुतीन यांच्या लिमोसिनचे पुढचे डाव्या बाजूचे चाक त्यावर जोराने आदळले आणि धूर येऊ लागला. पुतीन त्यांच्या घरी परतत असताना हा हल्ला घरापासून जवळच झाला असे सांगितले जात आहे.

घरी परतत असताना पुतीन यांच्या ताफ्यातील सुरक्षा कार समोर एक अँम्ब्युलंस अचानक येऊन थांबली त्यामुळे सुरक्षा कारवरचे नियंत्रण सुटले आणि ती भलतीकडेच भरकटली असेही सांगितले जात आहे. या मार्गावर तैनात असलेल्या अनेक सुरक्षा जवानांना व अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात आले असून काही जणांना अटक केली गेली आहे. २०१७ मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात पुतीन यांनी, त्यांच्यावर किमान पाच वेळा खुनी हल्ले केले गेल्याचे जाहीर केले होते. मात्र या हल्ल्यानंतर पुतीन यांनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमात काहीही बदल केला नाही.