‘ ५६इंच मोदीजी थाळी’ खा आणि मिळवा ८.५० लाख रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी देशात विविध प्रकारे साजरा केला जाणार आहे. भाजप देशभर या दिवशी आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिरे आयोजित करणार आहे. सर्वसामान्य मोदीप्रेमी सुद्धा त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार काही कार्यक्रम आयोजित करणार आहेत. दिल्लीच्या करोल बागेतील ‘आरडोर २.०’ रेस्टॉरंटने स्पेशल थाळी या निमित्ताने पेश केली असून त्याला ’५६ इंच मोदीजी थाळी’ असे नाव दिले आहे. यात ५६ प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ असतील.

मालक सुमित कालरा या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले,’ मला पंतप्रधान मोदी यांच्या विषयी नितांत आदर आहे. ते देशाचा गौरव आहेत. त्यांच्या जन्मदिवशी काही अनोखी भेट किंवा उपहार देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही ही जम्बो थाळी पेश केली आहे. वास्तविक मोदींनी आमच्याकडे येऊन मेजवानीचा पाहुणचार घ्यावा अशी आमची इच्छा आहे. पण सुरक्षा कारणास्तव ते शक्य नाही याची जाणीव आहे. त्यामुळे मोदींवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी आम्ही ‘येथे या, जेवणाचा आनंद घ्या आणि बक्षीस मिळवा’ असे आवाहन केले आहे.

जोडप्यापैकी कुणीही जो ही थाळी ४० मिनिटात फस्त करेल त्याला ८.५० लाख रुपये बक्षीस आम्ही देणार आहोत. १७ ते २६ सप्टेंबर दरम्यान जे येतील त्यांच्यासाठी भाग्यशाली विजेता सोडत काढली जाणार असून त्याअंतर्गत केदारनाथ ट्रीप चे तिकीट बक्षीस म्हणून दिले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.