यंदा लालबागच्या राजाला दानाद्वारे मिळाले ५ किलो सोने

करोना काळातील दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सव महाराष्ट्रात दणक्यात आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरा झाला. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी यंदा मोठ्या संखेने भाविक जमले आणि राजाच्या दानपेटीत करोडो रुपयांचे दान जमा झाले. गुरुवारी मंडळाची दानपेटी उघडली गेली तेव्हा भाविकांनी आपापल्या श्रद्धेनुसार अनेक किंमती वस्तू दानपात्रात टाकल्याचे समोर आले. सोने चांदी बरोबरच करोडो रुपयांची कॅश आणि एक बाईक सुद्धा जमा झाली असून या सर्व वस्तूंचा आता लिलाव केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लालबागच्या राजाला यंदा ५ किलो सोने, ६० किलो चांदी आणि पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक कॅश मिळाली आहे. सोन्याच्या वस्तुत चेन्स, उंदीर, मूर्ती,हार आणि अन्य दागिन्यांचा समावेश आहे तर चांदी मध्ये डिनर सेट्स, पेले, भांडी, विविध प्रकारची फुले, उंदीर,मुकुट, मोदक यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंचा लिलाव होणार आहे.

२०१८ मध्ये लालबाग राजाला मांडव दानातून साडेपाच किलो सोने, ७५ किलो चांदी मिळाली होती.२०१७ मध्ये एका भाविकाने १ किलो १०१ ग्राम वजनाची सोन्याची गणेश लक्ष्मी प्रतिमा दान केली होती.