प्राणी जगतात म्हणून खास आहे चित्ता

७० वर्षापूर्वी भारतात नामशेष म्हणून जाहीर करण्यात आलेले चित्ते आता पुन्हा एकदा भारतात वाढणार आहेत. नामिबियातून १७ सप्टेंबर रोजी खास विमानाने ५ माद्या आणि ३ नर चित्ते मध्यप्रदेशच्या कुनो पालपूर अभयारण्यात सोडले जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी हा कार्यक्रम होत आहे.

चित्ता हा अनेक अर्थाने प्राणी जगतातील हटके प्राणी आहे. जगातील सर्वात वेगवान म्हणून त्याची ओळख असून चित्ता ताशी १२० किमी वेगाने धावू शकतो. टॉप स्पीड मध्ये असताना तो २३ फुट लांब उडी किंवा झेप घेऊ शकतो आणि दर सेकंदाला चार झेपा घेतो. २०१२ मध्ये मादा चित्त सारा हिने जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट याचा विक्रम मोडला होता. ओहीयाच्या सीनसिनाटी प्राणी संग्रहालयात सारा ताशी ९८ किमी वेगाने धावली होती. उसेन बोल्टने १०० मीटर धावण्याचा विक्रम ९.५८ सेकंदात नोंदविला होता तर साराला त्यासाठी फक्त ५.९५ सेकंद लागली होती. २०१६ मध्ये सारा मरण पावली.

फोर्डची जीटी सुपरकार ३ सेकंदात १०० किमीचा वेग गाठते तर चिता ३ सेकंदात ९६ किमीचा वेग गाठतो आणि ३ सेकंदात पुन्हा २३ किमी वेगावर येऊ शकतो. शिकारी साठी त्याच्या हाती फक्त १ मिनिटाचा वेळ असतो कारण वेगाने तो फक्त १ मिनिटच धावू शकतो. त्याच्या पाठीचा कणा लांब आणि लवचिक असल्याने त्याला वेग घेणे शक्य होतेच पण त्याचे डोके आकाराने लहान, कान छोटे असल्याने सुद्धा त्याचा वेग अधिक वाढतो. कारण यामुळे त्याला हवेचा प्रतिरोध कमी होतो.

चिता वजनाने तुलनेने हलके म्हणजे ३६ ते ६५ किलो दरम्यात असतात. त्यामुळे चित्ता मोठ्या जनावरांची शिकार करत नाही. परिणामी त्याला वारंवार शिकार करावी लागते. चित्ता डरकाळी फोडत नाही तर मांजरासारखी गुरगुर करतो. त्याला २ किमी दूरचा आवाज सहज ऐकता येतो. चित्त्याचे पिलू आठ महिन्याचे झाले कि स्वतः शिकार करू लागते. चित्त्याच्या अंगावर दोन हजाराहून अधिक ठिपके असतात. त्याला रात्री कमी दिसते त्यामुळे ते दिवसाच शिकार करतात. त्यांचे सरासरी आयुष्य १२ वर्षे आहे.

चित्त्याच्या १०० पिलामध्ये केवळ ५ पिलेच पूर्ण आयुष्य जगतात. बाकीची लवकर मरतात. त्यामुळेच चित्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात शेवटचा चित्ता १९४८ मध्ये मारला गेला आणि १९५२ मध्ये सरकारने भारतातून चित्ते नामशेष झाल्याचे जाहीर केले होते. जगभरात सध्या ७ हजार चित्ते असून त्यातील ४५०० एकट्या द. आफ्रिकेत आहेत.