SCO शिखर परिषदेला उपस्थित राहणार PM मोदी, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होणार कोणत्या नेत्यांशी भेट आणि चर्चा


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या समरकंदला रवाना होत आहेत. जिथे ते SCO समिटमध्ये सहभागी होतील. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच सर्व स्थायी सदस्य देशांचे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. ही SCO शिखर परिषद अनेक अर्थांनी विशेष मानली जाते, कारण पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही यात सहभागी होत आहेत. या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रवाना होण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली.

या परिषदेत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही चर्चा होणार आहे.

कोणत्या नेत्यांना भेटणार?
एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींच्या भेटीबाबत परराष्ट्र सचिव म्हणाले की, यादरम्यान पीएम मोदी उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यासोबतच पंतप्रधान मोदी इतर नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. तथापि, पंतप्रधान मोदी शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेणार की नाही हे परराष्ट्र सचिवांनी सांगितले नाही.

परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, या शिखर परिषदेत व्यवसाय आणि पर्यटनावरही चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी समरकंद, उझबेकिस्तानला पोहोचतील. त्यानंतर ते उद्या 16 सप्टेंबर रोजी शिखर परिषदेत सहभागी होतील. या शिखर परिषदेत दोन सत्रे होणार आहेत. पहिले सत्र फक्त SCO देशांचे असेल. ज्यामध्ये केवळ स्थायी सदस्यच भाग घेऊ शकतात. यानंतर दुसऱ्या सत्रात निरीक्षक देशांचाही सहभाग असेल.

या संपूर्ण शिखर परिषदेत सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, व्यापार, पर्यटन आणि इतर बाबींवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे परराष्ट्र सचिवांनी सांगितले. भारत मध्य आशिया आणि शेजारी देशांशी आपले संबंध दृढ करण्यावर भर देणार आहे. चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे SCO चे संस्थापक सदस्य देश आहेत. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून सामील झाले.