नवा स्मार्टफोन घेताना लक्षात घ्या या गोष्टी

एकसारखी फीचर्स असलेले विविध किमतीचे आणि अनेक ऑफर्स देणाऱ्या स्मार्टफोन्सनी सध्या बाजारात एकच गर्दी केली आहे. जवळ जवळ रोज स्मार्टफोनची नवी मॉडेल्स बाजारात येत आहेत. अनेक कंपन्या एकाच सिरीज मधील अनेक मॉडेल्स सादर करत आहेत. अश्यावेळी नवा स्मार्टफोन घेताना कसा निवडावा असा संभ्रम पडणे साहजिक आहे. आपल्यासाठी कोणता स्मार्टफोन अधिक योग्य ठरेल हे ठरविण्यासाठी काही खास टिप्स या क्षेत्रातील तज्ञ देत आहेत.

आपल्या गरजा पुरविणारा, योग्य फोन, वाजवी किंमतीत खरेदी करण्यासाठी तुम्ही अगोदर काही गोष्टी स्वतः निश्चित केल्या पहिजेत. आपण किती रुपयांपर्यंतचा फोन खरेदी करू शकतो याचा एकदा नक्की निर्णय घेतला कि फोन खरेदीचे निम्मे काम सुलभ होते. तुमची गरज म्हणून फोन घ्यायचा कि केवळ देखावा, किंवा दुसऱ्या कुणी घेतला म्हणून आपण पण घ्यायचा आहे हे एकदा निश्चित केले पाहिजे. फोन तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे आपल्याला नक्की कशासाठी फोन हवा आणि किती किमतीत हवा हे प्रथम ठरवा.

दुसरी गोष्ट फोनची फीचर्स. आपल्याला फोन कशासाठी हवा, गेमिंग साठी, फोटोग्राफी साठी, चांगले बॅटरी लाईफ देणारा याचा हि निर्णय अगोदर करायला हवा. फोटोग्राफी साठी हवा असेल तर फोनचे कॅमेरा फिचर आपल्याला योग्य असे निवडले गेले पाहिजे. गेमिंग साठी हवा असेल तर जादा रॅमचा फोन निवडला पाहिजे. हाय पर्फोर्मंस थोडी जास्त किंमत मोजण्याची तयारी हवी. फोनच्या किंमती वाढल्या असून त्या कमी ठेवता याव्या म्हणून कंपन्या फीचर्स कमी देण्यावर भर देत असतात हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रायमरी फोन हवा असेल तर किमान १५ हजार रुपये खर्च करावे लागतील पण तो घेताना डिस्प्ले कसा आहे हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. जास्त पैसे देणार असू तर अमोलेड डिस्प्ले घेतला तर बॅटरी बॅकअप चांगला मिळेल. व्हिडीओ प्लेबॅकचा चांगला अनुभव घेता येईल. लेटेस्ट फीचर्स मध्ये मार्केट ट्रेंड वा नवीन फीचर्स अगोदर जाणून घ्यावी. अँड्राईड फोन घेत असला तर अँड्राईड १२ किंवा ११ ला प्राधान्य द्या. फार जुने व्हर्जन नवीन अपडेट सपोर्ट करू शकत नाही हे लक्षात घेऊन ही निवड केली पाहिजे.