कुनो अभयारण्यात येणाऱ्या पाहुण्या चित्त्यांचे फोटो प्रसिद्ध

नामिबिया येथून मध्यप्रदेशातील कुनो पालपूर अभयारण्यात सोडल्या जाणाऱ्या चित्त्यांचे फोटो जारी केले गेले आहेत. यात आठ चित्ते असून त्यातील पाच माद्या आणि तीन नर आहेत. यातील दोन चित्ते सख्खे भाऊ आहेत. निमिबियाच्या एका खासगी रिझर्व मध्ये ते राहत होते. चित्ता संरक्षण कोश ने दिलेल्या माहितीनुसार तीन नर चित्त्यापैकी दोन साडेपाच वर्षांचे तर तिसरा साडेचार वर्षाचा आहे. पाच मादा चित्त्यापैकी दोन पाच वर्षाच्या, दोन १ वर्षांच्या तर एक अडीच वर्षांची आहे. या चित्त्यांची सर्व कौटुंबिक माहिती दिली गेली आहे.

ज्या जम्बो जेट मधून हे चित्ते आणले जाणार आहेत त्या विमानामध्ये खास बदल केले गेले आहेत. चित्त्यांना जंगलाबाहेर आणले गेले असे वाटू नये अशी व्यवस्था त्यात केली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्त्यांचे सरासरी आयुष्य १२ वर्षे असते. चित्ते आणणाऱ्या विमान कंपनीने या खास फ्लाईटला खास फ्लॅग नंबर दिला असून हा नंबर आहे ११८. हा फ्लॅग नंबर नंतर संग्रहालयात जतन केला जाणार आहे. कंपनीने या संदर्भात म्हटले आहे, जगात प्रथमच चित्ते शिफ्ट करणे हा कोणत्याही कंपनी साठी ऐतिहासिक क्षण आहे.

चित्त्याची ही पहिली तुकडी १७ सप्टेंबर रोजी भारतात दाखल होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी,त्यांच्या उपस्थितीत हे चित्ते अभयारण्यात सोडले जाणार आहेत.