डॉ. टेड्रोस घेब्रेसास यांच्या मते करोनाचा अंत नजीक

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेसास यांच्या म्हणण्यानुसार आता करोनाचा अंत जवळ आला आहे. बुधवारी या संदर्भात त्यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत टेड्रोस म्हणाले, करोना जगातून संपविण्यासाठी यापेक्षा अधिक चांगली स्थिती गेल्या अडीच वर्षात कधी आली नव्हती. अजून थोड्या काळात करोनाचा अंत होऊ शकेल.

गेली सुमारे अडीच वर्षे करोना ने जगभर धुमाकूळ घातला मात्र आता या रोगाच्या खात्म्याच्या जवळ आपण पोहोचलो आहोत. मात्र सर्व देशांनी करोना नियंत्रणासाठीची आपापले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. या विषाणूने जगभरात ६५ लाख बळी घेतले आहेत. करोना संपविण्याची ही संधी साधण्यासाठी आपण काही महत्वाची पावले उचलायला हवीत. ही संधी दवडली तर करोनाची आणखी नवी नवी व्हेरीयंट येत राहतील, मृत्यू होत राहतील आणि त्यामुळे पुन्हा अनिश्चिततेचे वातावरण बनेल.

२०१९ मध्ये चीनच्या वूहान मध्ये कोविड १९ चा प्रथम उदय झाला असे सांगून टेड्रोस म्हणाले, गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर रिपोर्ट नुसार ताज्या करोना केसेस मार्च २०२० च्या तुलनेत निम्म्यावर आल्या आहेत. ११ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात जगभरात करोनाच्या नव्या केसेस मध्ये २८ टक्के घट झाली असून सध्या ही संख्या ३१ लाखांवर आली आहे. त्यापूर्वीच्या आठवड्यात नव्या केसेस मध्ये १२ टक्के घट नोंदविली गेली आहे.