टी २० वर्ल्ड कप, टीम इंडियाचे सरासरी वय ३१

टी २० वर्ल्ड कप २०२२ साठी टीम इंडियाची घोषणा झाली असून टी २० वर्ल्ड कपच्या इतिहासात यंदाची भारताची टीम ही चौथी जास्त वयाची टीम आहे. २०१६ मध्ये सुद्धा टीम मध्ये वयाने मोठ्या खेळाडूंची संख्या जास्त होती त्यामुळे टीमचे सरासरी वय तेव्हा ३४ वर्षे होते. तर २०१४ आणि २०२१ मध्ये टीम इंडियाचे सरासरी वय ३२ वर्षे होते. यावेळच्या टीम मध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

पूर्वी टी २०, युवा खेळाडूंचे फॉर्मॅट मानले जात असे पण आता परिस्थिती बदलली आहे. जुने जाणकार अनुभवी खेळाडू या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत आहेत. त्यामुळेच पहिला टी २० वर्ल्ड कप खेळणाऱ्या कार्तिकचे पुनरागमन झाले असून तो १२ वर्षानंतर पुन्हा खेळणार आहे. त्याचे वय ३७ वर्षे आहे तर सर्वात युवा खेळाडू अर्शदीपसिंग अवघा २३ वर्षाचा आहे. १६ ऑक्टोबर पासून ही स्पर्धा सुरु होत असून भारताचा पहिला सामना पाकिस्तान बरोबर २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ज्या दिवशी स्पर्धा सुरु होते त्या दिवशीचे टीम इंडियाचे सरासरी वय ३१ वर्षे १० दिवस असेल. यावेळी रोहित शर्मा सर्वात जास्त वयाचा कप्तान आहे त्याचे वय ३५ वर्षे १६९ दिवस आहे.

२०१० मध्ये टी २० साठी भारताची सर्वात युवा टीम होती आणि तिचे सरासरी वय होते २१ वर्षे १५० दिवस. त्यावेळी धोनी कप्तान होता पण त्यावेळी टीम इंडिया तीन सामने हरली होती. २०१६ मध्ये टीम इंडियाचे सरासरी वय ३४ वर्षे २६६ दिवस होते आणि तेव्हाही टीमचा कप्तान धोनीच होता.