Thank God Controversy: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा​विरोधात कोर्टात पोहोचली एक व्यक्ती


दिग्दर्शक इंद्र कुमारचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ अडचणीत सापडला आहे. या चित्रपटात अजय देवगण, रकुलप्रीत सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, रिलीजपूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अजय देवगणसह या लोकांवर गुन्हा दाखल
वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी दिग्दर्शक इंद्र कुमार, अभिनेते अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याविरोधात जौनपूर न्यायालयात खटला दाखल केला आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे 18 नोव्हेंबरला नोंदवले जाणार आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये धर्माची खिल्ली उडवली गेली आहे आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

आपल्या याचिकेत श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, अजय देवगण चित्रगुप्ताची भूमिका करताना सूट घातलेला दिसत आहे आणि एका दृश्यात तो विनोद आणि आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसत आहे. याचिकेत म्हटले आहे की, “चित्रगुप्त हा कर्माचा देव मानला जातो आणि तो माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मांची नोंद ठेवतो. देवतांच्या अशा चित्रणामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याने अप्रिय परिस्थिती निर्माण होऊ शकते.

चित्रपटाची कथा कशी आहे?
इंद्र कुमार दिग्दर्शित हा चित्रपट यमलोकाच्या कथेवर आधारित असेल. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात नोरा फतेहीचा एक आयटम नंबरही ठेवण्यात आला आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.