महिला सहकाऱ्याचा पाठलाग करणे आणि अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला अटक


मुंबई : मुंबईतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला त्याच्या महिला सहकाऱ्याचा पाठलाग, मारहाण आणि अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

पोलीस अधिकाऱ्यावर एफआयआर दाखल
कांदिवली भागातील कुरार पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले की, आरोपी एपीआय दीपक बाबुराव देशमुख याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, देशमुख यांच्या विरोधात त्यांच्या एका महिला सहकाऱ्याने मंगळवारी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे देशमुख यांच्या विरोधात तिचा विनयभंग करणे, तिचा पाठलाग करणे, तिला अश्लील मेसेज पाठवणे आणि घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

या कारणावरून महिलेला करण्यात आली मारहाण
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एपीआय देशमुख यांची नुकतीच पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्या महिला पोलीस अधिकाऱ्यामुळेच तिची बदली झाल्याचे देशमुख यांना वाटत होते, त्यामुळेच त्यांनी तिचा छळ सुरू केला, असे पोलिसांना तपासात आढळून आले. मात्र, मंगळवारी देशमुख यांनी महिलेच्या घरात घुसून मारहाण केल्याने महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

आरोपींविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आरोपी देशमुखविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 354 (महिलेचा विनयभंग करणे), 354-डी (पाठलाग करणे), 452 (घरात विनापरवानगी प्रवेश) यासह संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.