इंडोनेशियाच्या चलनावर विराजमान आहेत गणपतीबाप्पा

इंडोनेशिया हा मुस्लीम देश म्हणूनच ओळखला जातो. या देशात ८७.५ टक्के नागरिक इस्लाम पालन करणारे आहेत तर हिंदूंची संख्या आहे अवघी ३ टक्के. तरीही या देशात अनेक हिंदू प्रतीके, हिंदू देवी देवता मंदिरे आहेत तसेच अनेक नागरिकांची नावे सुद्धा हिंदू आहेत. येथे हिंदू परंपरांचे पालन मोठ्या श्रद्धेने केले जाते. सर्वात विशेष म्हणजे येथील चलनी नोटेवर चक्क गणपती बाप्पा विराजमान आहेत. इतकेच नव्हे तर येथील मिलिटरी इंटेलीजन्सचा शुभंकर सुद्धा हनुमान आहे.

येथील चलनाला रुपियाह म्हटले जाते. इंडोनेशियाच्या २० हजार रुपये मूल्यांच्या नोटेवर गणपतीचे चित्र आहे. येथे गणेश ही शिक्षण, कला आणि विज्ञानाची देवता मानली जाते. या नोटेवर पुढच्या बाजूला गणपतीबाप्पा आहेत तर मागच्या बाजूला शाळेच्या वर्गाचे चित्र आहे. येथील पहिले शिक्षण मंत्री हजर देवान्त्रा यांचाही फोटो आहे. त्यांना इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचे नायक मानले जाते.

यामागे एक अशीची कथा सांगतात की काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था अतिशय खराब अवस्थेत होती. तेव्हा राष्ट्रीय विचारवंतानी खूप विचार केला आणि २० हजार मूल्याची नोट जारी करायचा निर्णय घेतला. त्या नोटेवर गणेशाची प्रतिमा छापण्यात आली. काही दिवसात देशाची अर्थव्यवस्था सावरली. पण गणेशामुळेच हे झाले असा येथील लोकांचा विश्वास आहे. इंडोनेशिया मधील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळावर अर्जुन आणि कृष्ण यांच्या मूर्ती असून घटोत्कच यांचीही प्रतिमा येथे आहे.