अंत्यसंस्काराला येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना बस प्रवासाचा सल्ला

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर सोमवारी अत्यसंस्कार केले जात असून त्यासाठी सुमारे ५०० विदेशी निमंत्रित येण्याची शक्यता आहे. या पाहुण्यांनी लंडनला येताना व्यावसायिक विमानाने प्रवास करावा आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणी येताना प्रवासासाठी बसचाच वापर करावा, खासगी वाहने किंवा हेलीकॉप्टर आणू नयेत अश्या सूचना जारी केल्या गेल्या आहेत. महाराणीच्या अंत्यसंस्काराची तयारी जोरात सुरु झाली असून या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होणार हे लक्षात घेऊन वरील सूचना जारी केल्या गेल्याचे सांगितले जात आहे.

१९६५ मध्ये माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यानंतर ब्रिटन मध्ये हा पहिलाच राजकीय अंतिम संस्कार होणार आहे. त्यामुळे मोठी गर्दी होणार हे गृहीत धरले गेले आहे. गर्दीवर नियंत्रण राहावे आणि सुरक्षा राखली जावी यासाठी हजारो पोलीस लंडन मध्ये तैनात केले गेले आहेत. अंतिम संस्काराच्या एक रात्र अगोदर रविवारी रात्री आठ वाजता एक मिनिटांचे मौन पाळले जाईल अशी घोषणा डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाकडून केली गेली आहे. हा राष्ट्रीय शोकाचा एक भाग आहे.

विशेष म्हणजे रशिया, बेलारूस आणि म्यानमार सरकारला राणीच्या अंत्यविधीचे निमंत्रण दिले गेलेले नाही. रशियावर आर्थिक निर्बंध लागू केल्याने आणि रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला, तसेच रशियाला बेलारूसने समर्थन दिल्याने या दोन देशांना वगळले गेले आहे. तसेच म्यानमार मधील हुकुमशाहीला ब्रिटनचा प्रथमपासून विरोध असल्याने त्या देशाला सुद्धा वगळले गेल्याचे सांगितले जात आहे. अंत्यसंस्काराला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, फर्स्ट लेडी जिल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचे पंतप्रधान यांना निमंत्रित केले गेले आहे.