तीस वर्षांपूर्वीच बनविली गेली होती महाराणीची शवपेटी

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर येत्या सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाराणीचे पार्थिव ज्या शवपेटीतून बकिंघम पॅलेस मध्ये आणले गेले ती शवपेटी सुमारे ३२ वर्षांपूर्वीच तयार केली गेली होती असे समजते. ही शवपेटी इंग्लिश ओक वृक्षाच्या लाकडापासून बनविली गेली आहे. आज हे लाकूड दुर्मिळ मानले जाते. सध्याच्या शवपेट्या अमेरिकन ओक वृक्षाच्या लाकडापासून बनविल्या जातात असे सांगतात.

राणीच्या शवपेटीच्या चारी बाजूना काच लावली गेली असून ही शाही परंपरा आहे. शव दफन केल्यावर दीर्घकाळ संरक्षित राहण्यास त्यामुळे मदत होते. काचेमुळे बाहेरची हवा आणि आर्द्रता आत जाऊ शकत नाही. पण या प्रकारच्या शवपेट्या वजनाला खूप जड बनतात. शवपेटी उचलण्यासाठी आठ माणसे लागतात. प्रिन्स फिलीप यांच्या साठी अश्याच प्रकारची शवपेटी वापरली गेली होती. त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते.

महाराणीच्या शवपेटीच्या झाकणावर किंमती फिटिंग्ज सुरक्षितपणे ठेवता येतील या प्रकारे तिचे डिझाईन केले गेले आहे. त्यात इम्पिरिअल स्टेट क्राऊन, ऑर्ब, व राजदंड यांचा समावेश आहे. या वस्तू सम्राट किंवा राणीच्या विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करतात. शवपेटीची पितळ्याची हँडल्स सुद्धा खास प्रकारे डिझाईन केली जातात. रविवारी प्रथम महाराणीच्या शवपेटीचे दर्शन झाले. सोमवारी खुल्या वाहनातून मिरवणूक काढून बुधवारी लंडनच्या वेस्ट मिन्स्टर मध्ये ही शवपेटी आणली जात आहे.