ऑक्सफर्ड शब्दकोषात सामील झाले जुगाड, झुग्गी, यार

प्रसिद्ध ऑक्सफर्ड शब्दकोषात जुगाड, झुग्गी, यार, चक्का जाम, छी छी ,दादागिरी अश्या नव्या शब्दांची भर पडली आहे. १४ सप्टेंबरचा दिवस देशात हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय भाषांचा जगभर प्रसार झाला आहे आणि हिंदी, भारताशिवाय अनेक देशात बोलली जाते. प्रसिद्ध ऑक्सफर्ड शब्द्कोशाने रोजच्या वापरात येणारे अनेक हिंदी शब्द समाविष्ट करून घेतले असून दरवर्षी त्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. २०२० मध्ये आत्मनिर्भर हा शब्द वर्षाचा हिंदी शब्द म्हणून निवडला गेला होता.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया तर्फे दिल्या गेलेल्या माहितीनुसार कोविड १९ काळात देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती तेव्हा ‘आत्मनिर्भर भारत’ या शब्दाकडे शस्त्र रुपात पाहिले गेले होते. गेल्या २६ जानेवारीला राजपथावर आत्मनिर्भर भारत रथ सामील केला गेला होता. त्याचप्रमाणे २०१७ मध्ये ‘आधार’, २०१८ मध्ये ‘नारी शक्ती’, २०१९ मध्ये संविधान हे शब्द वर्षात सर्वाधिक वेळा वापरले गेलेले शब्द म्हणून ऑक्सफर्ड मध्ये नोंदविले गेले होते. गेल्या काही वर्षात २६ हिंदी शब्द आणि एकूण ३८४ भारतीय शब्दांना ऑक्सफर्ड मध्ये जागा दिली गेली आहे.

चावल,शादी, हडताल, डब्बा, चॅटबॉक्स, फेक न्यूज हे शब्द अगोदरच सामील केले गेले असून चाळ, अब्बा, अण्णा, गुलाबजामून, बापू, सूर्यनमस्कार, मिर्च मसाला, खिमा, अंडा, चमचा, नाटक, चुप असे अनेक शब्द ऑक्सफर्ड शब्दकोषात जागा मिळवून राहिले आहेत.