युक्रेनमधून पळ काढत आहे रशियन सैन्य, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीचा दावा – 6 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र घेतले ताब्यात


कीव: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितले की युक्रेनच्या सैन्याने या महिन्यात बदला म्हणून रशियाकडून 6,000 चौरस किलोमीटर (2,320 चौरस मैल) भूभाग ताब्यात घेतला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून, आमच्या सैन्याने पूर्व आणि दक्षिणेकडील युक्रेनचा 6,000 चौरस किलोमीटरचा भूभाग आधीच मुक्त केला आहे. आता आम्ही पुढे जात आहोत, असे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात सांगितले.

युक्रेनने ईशान्येकडील खार्किव प्रदेशही घेतला ताब्यात
इझियम, कुपियान्स्क आणि बालाक्लिया शहरांसह डझनभर क्षेत्रे ताब्यात घेऊन, ईशान्येकडील खार्किव प्रदेशात त्याच्या प्रति-आक्रमणात युक्रेनने मोठ्या यशाचा दावा केला आहे. त्याचवेळी, रशियाने हे देखील मान्य केले आहे की युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किवच्या आग्नेयेकडील भागातून आपले सैन्य मागे हटले आहे. अशा स्थितीत सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा हा भाग युक्रेनच्या लष्कराच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे खार्किववर शत्रूच्या हल्ल्याचा धोकाही बराच कमी झाला आहे.

युक्रेनने केला दक्षिण खेरसन प्रदेशातही मोठ्या यशाचा दावा
युक्रेनने दक्षिण खेरसन भागातही मोठे यश मिळविल्याचा दावा केला आहे. युक्रेनियन सैन्याने सोमवारी सांगितले की त्यांनी 500 चौरस किलोमीटरचा ताबा घेतला आहे. यूएस-आधारित इन्स्टिट्यूट फॉर स्टडी ऑफ वॉर थिंक टँकने म्हटले आहे की युक्रेनने युद्ध आपल्या बाजूने वळवले आहे, परंतु सध्याच्या प्रतिहल्ल्याने युद्ध संपणार नाही. सध्या युक्रेनच्या प्रत्युत्तरादाखल रशिया हतबल झाला असून आता रशियन सैन्य युक्रेनच्या अनेक भागातून पळ काढत आहे.