रस्ते अपघातातील जीवितहानी होणार कमी, नितीन गडकरींनी तयार केली खास योजना


मुंबई – देशात रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा बळी जात आहे. रस्ते अपघातातील मृतांची संख्या रोखण्यासाठी केंद्र सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. खुद्द रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. यासोबतच जनतेवरील टोलचा बोजा कमी करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

एका खाजगी वाहिनीशी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, स्थानिक लोकांच्या वाहनांची ओळख करून त्यांना टोलमध्ये सूट देणारे सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे. चार महिन्यांत टोलनाक्यांवर ते सुरू होण्याची शक्यता आहे.

ते पुढे म्हणाले की, टोल बुथजवळ राहणारे आणि रोज कामावर जाणाऱ्या लोकांना नियमित टोल भरावा लागू नये, यासाठी नवीन धोरण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून लोकांची सोय होईल. विशेषत: या धोरणामुळे टोल बूथच्या एका बाजूला राहणाऱ्या आणि दुसऱ्या बाजूला टोल बूथ ओलांडणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळेल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे आढळल्यास नागरिकांच्या तक्रारीवरून ते तीन दिवसांत भरण्यात येतील, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले आहे. तर कारमध्ये अशी यंत्रणा तयार केली जाईल, जी गाडीच्या मागे बसलेल्या व्यक्तींनी सीट बेल्ट घातली नसताना सायरन वाजेल. त्यामुळे रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या कमी होईल.

गडकरी पुढे म्हणाले की, कारचे इकॉनॉमी मॉडेल निर्यात करायचे असेल, तर त्यात 6 एअरबॅग दिल्या जातात, मात्र देशात इकॉनॉमी मॉडेल आणल्यावर त्यात फक्त दोनच एअरबॅग का दिल्या जातात? एका एअर बॅगची किंमत फक्त एक हजार रुपये आहे, दोन एअर बॅग बसवल्या जात असतील, तर उरलेल्या एअर बॅगही कंपन्यांनी बसवाव्यात, असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.