Attorney General : मुकुल रोहतगी पुन्हा होऊ शकतात अॅटर्नी जनरल, 91 वर्षीय निवृत्त होत आहेत केके वेणुगोपाल


नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी पुन्हा एकदा भारताचे अॅटर्नी जनरल बनू शकतात. रोहतगी हे 2014 ते 2017 या काळात देशाचे अॅटर्नी जनरलही होते. विद्यमान अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. 91 वर्षीय वेणुगोपाल आता या पदावर राहण्यास इच्छुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या हवाल्याने रोहतगी यांच्याबाबतची ही माहिती समोर आली आहे. रोहतगी यांच्या नियुक्तीची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही.

2020 मध्ये तीन टर्म पूर्ण केल्यानंतर, वेणुगोपाल यांनी सरकारला त्यांचे वय लक्षात घेऊन जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. सरकारने वेणूगोपाल यांना पुढील कार्यकाळासाठी काम करण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी आणखी दोन वर्षे या पदावर राहण्याचे मान्य केले. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, मुकुल रोहतगी 1 ऑक्टोबरपासून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू करतील. त्यांनी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केले आहे. 2017 मध्ये रोहतगी यांच्या राजीनाम्यानंतरही सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यासह संवेदनशील मुद्द्यांवर त्यांचा सल्ला घेतल्याचे सांगितले जाते.