व्हॅक्यूम पंपाने महिलेची प्रसूती, डॉक्टरांनी स्वीकारला 3 इडियट्सचा फॉर्म्युला


जालना: काही वर्षांपूर्वी आलेला 3 इडियट्स चित्रपटातील तो सीन तुम्हाला अजूनही आठवत असेल, ज्यामध्ये करीना कपूरची तिच्या बहिणीची व्हॅक्यूम पंपद्वारे नॉर्मल डिलिव्हरी केली होती. महाराष्ट्रातील जालना येथील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी अशाच पद्धतीचा वापर करून महिलेची सामान्य प्रसूती केली आहे. जो फॉर्म्युला तुम्ही आत्तापर्यंत फक्त चित्रपटांमध्ये पाहिला, तो फॉर्म्युला आता प्रत्यक्षातही स्वीकारला गेला आहे. डॉक्टरांच्या टीमने आमिर खानच्या थ्री इडियट्स चित्रपटाचा फॉर्म्युला स्वीकारून व्हॅक्यूम पंपाच्या मदतीने एका महिलेची प्रसूती केली आहे. गर्भवती महिलेला मणक्याचा आजार असल्याने डॉक्टरांनी व्हॅक्यूम पंपाचा आसरा घेतला.

ती महिला किफोस्कोलिओसिस नावाच्या आजाराने ग्रस्त होती. या आजारात रुग्णाच्या पाठीचा कणा वाकडा होतो. ही गुंतागुंतीची प्रसूती जालना येथील शासकीय महिला रुग्णालयात करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला घनसावंगी तालुक्यातील राणी उचेगाव येथील रहिवासी आहे. गोदावरी सुंदरलाल असे तिचे नाव असून तिचे वय 21 वर्षे आहे.

का करावी लागली लवकर डिलिव्हरी ?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या आजारामुळे महिलेच्या गर्भाशयात बाळासाठी पुरेशी जागा नव्हती. तर दुसरीकडे महिलेच्या रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाणही 78 हजारांवर आले होते. अशा स्थितीत तिचे ऑपरेशन धोकादायक ठरू शकते. रुग्णालयाचे डीन डॉ. एस.आर. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, महिलेची वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन आम्ही व्हॅक्यूम पंपच्या मदतीने प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.

17 डॉक्टरांच्या पथकाने केले हे काम
हे व्हॅक्यूम पंप डिलिव्हरी अवघड आणि अद्वितीय होते. ज्यामध्ये रुग्णालयातील 17 डॉक्टरांनी काम केले. सुमारे 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर महिलेने मुलाला जन्म दिला. सध्या आई आणि बाळ दोघांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या मते, जेव्हा प्रसूती प्रक्रियेत अडचणी येतात आणि ते लवकर पूर्ण करणे आवश्यक असते. तेव्हा अशा तंत्राचा अवलंब केला जातो.