शिवसेना फुटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य, जाणून घ्या कोणाला धरले जबाबदार


मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फुटीवरून मोठे वक्तव्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेतील फुटीसाठी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीला जबाबदार धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवणे, ही त्यांची सर्वात मोठी राजकीय चूक असल्याचेही ते म्हणाले.

उद्धव यांची कार्यशैली जबाबदार – फडणवीस
मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज्यातील अलीकडच्या राजकीय घडामोडींसाठी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले पाहिजे, असे सांगितले. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय संकटाला फक्त उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत. शिवसेनेच्या फुटीला त्यांची कार्यशैली कारणीभूत आहे. सुमारे 30-40 आमदारांनी महाविकास आघाडी सोडली आणि याची त्यांना कल्पना नव्हती.

फडणवीस म्हणाले, उद्धवजी त्यांच्या भाषणात म्हणायचे, तुम्ही माझे सरकार पाडण्याचा प्रयत्न तर करून दाखवा. फडणवीस म्हणालो, एक दिवस तुमचे सरकार पडेल आणि तुम्हाला ते कळणारही नाही आणि नेमके तेच झाले.

आमदारांनी केले होते बंड
काही काळापूर्वी राज्यातील सुमारे 40 शिवसेना आमदारांनी बंड केले होते, त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी (शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस) सरकार अल्पमतात आले होते. यानंतर शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. पुढे 30 जून रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.