केवळ कोहिनूरच नाही, जगातून अनेक मौल्यवान वस्तूंची ब्रिटिशांनी केली लूट

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राणीच्या मुकुटात विराजमान असलेल्या भारताच्या मौल्यवान कोहिनूर हिऱ्याचे काय होणार याची चर्चा सुरु झाली असून भारताला हा कोहिनूर परत मिळाला पाहिजे अशी मते सोशल मिडीयावर व्यक्त होऊ लागली आहेत. ट्वीटर वर सध्या कोहिनूर ट्रेंड करत आहे. पण जगातील अन्य देशांवर सत्ता गाजविताना इंग्रजांनी त्या त्या देशातून सुद्धा अनेक मौल्यवान वस्तू मायदेशी नेल्या आणि आजही त्या ब्रिटन मध्येच आहेत.

भारताच्या गोलकोंडा खाणीत ८०० वर्षांपूर्वी कोहिनूर हिरा सापडला होता. प्रकाशाचा पर्वत असा कोहिनूरचा अर्थ आहे. राणीच्या मुकुटात हा हिरा बसविला गेला होता. त्याचंबरोबर राणीच्या मौल्यवान संपत्ती मध्ये ‘ ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका’ हा हिरा सुद्धा आहे. जगातील हा सर्वात मोठा हिरा द. आफ्रिकेतील खाणीत १९०५ मध्ये मिळाला आणि हा हिरा एडवर्ड सातवा याला भेट दिला गेला होता. नंतर तो चोरी झाला असे म्हटले जात होते पण ब्रिटीश सरकारनेच तो लुबाडला असे सांगतात. हा हिरा राणीच्या राजदंडात आहे.

टिपू सुलतानाचा लढाईत पराभव केल्यावर त्याच्या मृतदेहावरून त्याची अंगठी ब्रिटीशानी काढून घेतली होती असे म्हणतात. १७९९ सालची ही घटना. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने १ लाख ४५ हजार पौड मोजून ही अंगठी लिलावात खरेदी केली असे सांगितले जाते. याच बरोबर इजिप्त मधून रोसिटा स्टोन चोरून नेला गेला आणि आता तो ब्रिटीश संग्रहालयात आहे. हा स्टोन १९६ इसवी पूर्व काळातला असून इतिहासकारांच्या मते फ्रांस विरुद्ध लढाई जिंकल्यावर हा स्टोन ब्रिटन मध्ये नेला गेला.