महाराणी एलिझाबेथच्या गुप्त पत्राबद्दल गूढ वाढले

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाला लिहिलेल्या एका गुप्त पत्राची चर्चा सुरु झाली असून या पत्रात काय मजकूर असावा याविषयीचे गूढ वाढले आहे. राणीच्या निधनानंतर हे रहस्यमयी आणि धक्कादायक सत्य समोर आले असले तरी हे पत्र २०८५ पर्यंत म्हणजे आणखी ६३ वर्षे उघडता येणार नाही असेही समजते.

मिळालेल्या माहितीनुसार सिडने शहरातील ऐतिहासिक इमारतीच्या तिजोरीत हे पत्र ठेवले गेले आहे. या पत्रातील मजकुराबाबत राणीच्या खासगी कर्मचाऱ्याना सुद्धा काहीही माहिती नाही. ऑस्टेलिया न्यूज चॅनल ७ नुसार हे गुप्त पत्र महाराणीने १९८६ मध्ये लिहिले. तेव्हा राणीने सिडने मधील नागरिकांसमोर एक भाषण केले होते. पत्र देताना सिडने मेअरला अशी सूचना केली गेली की, २०८५ पर्यंत हे पत्र उघडायचे नाही. त्यावेळी जो कुणी महापौर असेल तो हे पत्र उघडेल. त्यात सिडनेच्या नागरिकांसाठी एक संदेश आहे असे म्हटले जात आहे.

महाराणी एलिझाबेथ ऑस्ट्रेलियाची राज्यप्रमुख होती आणि तिने १६ वेळा ऑस्ट्रेलियाला भेट दिली होती. तिची ऑस्ट्रेलियन नागरिकांशी विशेष जवळीक होती. सीएनएनच्या रिपोर्ट नुसार १९९९ मध्ये महाराणीला ऑस्ट्रेलियाची राज्य प्रमुख पदावरून हटविण्यासाठी जनमत चाचणी घेतली गेली मात्र त्यात विरोधकांचा पराभव झाला होता. रविवारी किंग चार्ल्स तिसरे यांच्या नावाची ऑस्ट्रेलियाचे राज्यप्रमुख म्हणून घोषणा केली गेली आहे.