सोडियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात घडविणार क्रांती

इलेक्ट्रिक वाहनात लिथियम आयन ऐवजी सोडियम आयन बॅटरीचा वापर करण्याबाबत मोठे संधोधन जगभरात सुरु असून या मुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात क्रांती घडेल असे संकेत मिळू लागले आहेत. पेट्रोल डीझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषण यामुळे जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चालली असली तरी त्यात वापरल्या जात असलेल्या लिथियम आयन बॅटरीच्या किंमती जास्त आहेत आणि त्यामुळे अजूनही इलेक्ट्रिक वाहने सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येऊ शकलेली नाहीत. सोडियम आयन बॅटरी लिथियम आयनच्या तुलनेत अधिक सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरण पूरक ठरत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

अमेरिकेच्या युएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी मधील रिसर्च टीमने दीर्घ संशोधनातून  सोडियम आयन बॅटरी विकसित केली असून भविष्यातील तंत्रज्ञान असा त्याचा उल्लेख केला आहे. ही बॅटरी वाहनाची पूर्ण दिवसाची गरज भागवू शकते, तिच्यामध्ये सौर उर्जा साठविता येते, असे दिसून आले आहे. प्रयोगशाळेत नाण्याच्या आकाराच्या बॅटरीचे परीक्षण करताना ती ३०० वेळा रिचार्ज करता आली आणि तरीही तिची क्षमता कायम राहिली. लिथियम आयन बॅटरी वारंवार चार्ज केली तर तिची क्षमता कमी होते.

लंडनच्या इम्पिरीयल कॉलेज मधील वैज्ञानिकांनी वेगाने चार्ज होणारी, सोडियम आयन बॅटरीचा प्रोटोटाईप बनविला आहे. सोडियम सहज उपलब्ध आहे, तसेच त्यापासून पर्यावरणाला धोका नाही आणि मुख्य म्हणजे ते फारसे महाग नाही अशी त्याची वैशिष्टे सांगितली जात आहेत. भारतात सोडियम बॅटरी विकसित करण्याबाबत वेगाने संधोधन सुरु असून आयआयटी खरगपूर मधील संशोधकांनी नॅनो मटेरियलचा वापर करून सोडियम आयन बेस्ड बॅटरी व सुपर कपॅसीटर डेव्हलप केले आहेत. सोडियम आयन बॅटरीचा वापर इलेक्ट्रिक वाहनात झाला तर वाहनांच्या किंमती २५ टक्के कमी होऊ शकणार आहेत असा दावा केला जात आहे.

इलेक्ट्रिक वाहनात त्याच्या किंमतीच्या ५० ते ६० टक्के खर्च हा लिथियम बॅटरीचाच आहे. त्याला पर्याय म्हणून सोडियम बॅटरी योग्य ठरत आहेत. लॅपटॉप, मोबाईल्स व इव्ही मध्ये लिथियम बॅटरीचाच वापर होतो त्यामुळे २०१२ मध्ये प्रती टन ४५०० डॉलर्सने मिळणारे लिथियम आता ८० हजार प्रती टन झाले आहे. त्या तुलनेत सोडियमचे दर प्रती टन ८०० डॉलर्स आहेत असे समजते.