ओणम निमित्त केरळात एक दिवसात ११७ कोटींची दारू विक्री

केरळच्या स्टेट बेवरेजेस कार्पोरेशन, बेवको ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केरळात ओणम सणाच्या एक दिवस अगोदर तब्बल एक दिवसात ११७ कोटींची दारू विकली गेली आहे. गेली दोन वर्षे या उत्सव काळात करोना बंधने होती त्यामुळे दारू विक्रीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. शुक्रवारी जाहीर केल्या गेलेल्या आकडेवारी नुसार ओणम पूर्वीच्या एक आठवड्यात गतवर्षी ५२९ कोटींची दारू विक्री झाली होती तर या वर्षी हा आकडा ६२४ कोटींवर गेला आहे.

ओणम निमित्ताने सर्व सरकारी दारू विक्री दुकानांना सुट्टी असल्याने त्या अगोदर नागरिकांनी स्टॉक करून ठेवण्यास प्राधान्य दिल्याचे या वरून दिसून आले आहे. ओणमचा उत्सव केरळात १० दिवस साजरा होतो. या काळात ७०० कोटींचा महसूल मिळेल असा अंदाज वर्तविला जात आहे. केरळ मध्ये दारू आणि लॉटरी विक्रीतून राज्य सरकारला मोठा महसूल मिळतो. आकडेवारी नुसार गेल्या काही वर्षात केरळ मध्ये मद्यातून सरासरी प्रतिवर्ष १४००० कोटी तर लॉटरीमधून प्रतिवर्ष सरासरी १ हजार कोटींचा महसूल सरकारला मिळतो. राज्यात दारूवर प्रचंड कर आहे. १०० ते १५० रुपये उत्पादन शुल्क असलेल्या रमच्या एका बाटलीसाठी ६०० ते ८०० रुपये मोजावे लागतात.

केरळ मध्ये प्रतिवर्ष, प्रतिव्यक्ती दारू खप ८.५ लिटर असून राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण ५.७ लिटर आहे. ग्रामीण भागातील १८.७ टक्के तर शहरी भागात २१ टक्के पुरुष मद्यप्राशन करतात. वर्षभर दारूच्या दुकानासमोर रांगा हे नेहमीचे चित्र आहे. रांगा लागू नयेत म्हणून मध्यंतरी सरकारने होम डिलिव्हरीची सुरवात केली होती पण चर्च आणि दारूबंदी आंदोलकांच्या मुळे ही सुविधा बंद करावी लागली असे समजते.