महाराणी एलिझाबेथ निधन- भारतात एक दिवसाचा दुखवटा

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात असतानाच भारताने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर म्हणजे रविवारी देशातील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविले जाणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे. तसेच या दिवशी करमणुकी संदर्भातील कुठलाही कार्यक्रम होणार नसल्याचे कळविले गेले आहे.

भारताबरोबरच जगातील ५४ देशांमध्ये दुखवटा पाळला जाणार असून तेथील राष्ट्रध्वज अर्थ्यावर उतरविले जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाउस आणि सर्व सरकारी इमारती आणि सैन्य प्रतिष्ठानांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविले जात असल्याची घोषणा केली आहे.

ब्रिटन मध्ये १० दिवसांच्या दुखवटा पाळला जात असून या काळात सर्व सरकारी इमारतींवरील ध्वज अर्थ्यावर उतरविले गेले आहेत. या काळात अतिमहत्वाची कामे वगळता अन्य सर्व कार्यक्रम रद्द केले गेले असून मंत्र्यांचे दौरे, मुलाखती, पत्रकार परिषदा घेतल्या जाणार नाहीत. अंत्यसंस्काराच्या आधी तीन दिवस महाराणीचे पार्थिव वेस्टमीन्स्टर हॉल मध्ये ठेवले जात असून येथेच महाराणीची आई, जॉर्ज पंचम, विन्स्टन चर्चिल व विलियम ग्लॅडस्टोन यांच्या कबरी आहेत. पूर्ण राजकीय इतमामात महारानीवर वेस्टमीन्स्टर अॅबे येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.