भारतीय क्रिकेट टीम आणि महाराणीचे नाते होते खास

आशिया कप मध्ये टीम इंडियाच्या विराटने अफगाणिस्थान विरुद्ध शतक ठोकल्याचा उल्हास साजरा होत होता तेव्हा सुमारास राणी एलीझाबेथ यांच्या निधनाच्या वार्तेने ब्रिटनवर शोककळा पसरली होती. परिणामी द. आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी एक दिवस पुढे ढकलली गेली. क्रिकेटचा विचार केला तर भारतीय क्रिकेट आणि महाराणी एलिझाबेथ यांचे नाते खास होते. याचे कारण म्हणजे भारतीय संघाने पहिला आंतरराष्ट्रीय विजय एलिझाबेथ महाराणी बनल्यावरच मिळविला होता.

स्वातंत्रपूर्व काळापासून भारतात ब्रिटीश राज असतानाच क्रिकेटची सुरवात झाली होती. १९३२ मध्ये भारतीय संघ इंग्लंड मध्ये पहिला सामना खेळला होता पण पहिल्या विजयासाठी मात्र संघाला दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. पण विशेष म्हणजे पहिल्या विजयाचे नाते महाराणीशी जोडले गेले. ब्रिटनचे महाराजा जॉर्ज सहा यांचे निधन झाल्यावर एलिझाबेथ ६ फेब्रुवारी १९५२ मध्ये महाराणी बनल्या. त्यांच्या राज्याभिषेकानंतर भारतीय टीमने पहिल्या टेस्ट मध्ये विजय मिळविला तो ६ ते १० फेब्रुवारी या कालावधीत. हा सामना भारताने एक डाव आणि आठ रन्स नी जिंकला होता.

६ फेब्रुवारी रोजीच जॉर्ज सहावे यांचे निधन झाले त्यामुळे पुढच्या दिवसाचा खेळ झाला नाही. ७ फेब्रुवारी हा रेस्ट डे होता. त्यानंतर भारताने सामन्यावर पकड मिळवली आणि इंग्रजांवर पहिला विजय मिळविला. यात इंग्लंडचा पहिला डाव २६६ धावांवर संपला होता. त्याला उत्तर देताना भारताने ९ विकेटवर ४५७ धावा करून डाव घोषित केला. दुसर्या डावात इंग्लंडला फक्त १८३ धावा करता आल्या आणि भारताने सामना जिंकला.