महाराणी एलिझाबेथ यांच्या कमाईचे असे होते स्रोत, इतकी आहे संपत्ती

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाल्याची घोषणा केली गेली आहे. जगातील शक्तिशाली व्यक्तींमधील एक असलेल्या एलिझाबेथ अश्या एकमेव महिला होत्या ज्यांना परदेशी प्रवासासाठी पासपोर्ट किंवा व्हिसाची आवश्यकता नव्हती. राणीची संपत्ती मोजता येण्याच्या पलीकडे असल्याचे सांगितले जाते पण राणीच्या कमाईचे मार्ग कोणते या विषयी मात्र अनेक दावे केले जातात. शाही परिवारातील सदस्यांना देशातील करदात्यांकडून मोठी रक्कम मिळते हे आपण ऐकून आहोत पण त्या शिवाय त्यांच्या अन्य कमाईचे स्रोत अज्ञात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महाराणी एक्लीझाबेथ यांच्या कमाईचे तीन मुख्य मार्ग मानले जातात. पहिले सोव्हेरीन ग्रँड, दुसरे प्रीव्ही पर्स आणि तिसरा खासगी संपत्तीतून होणारी कमाई. राणीची संपत्ती किती याचे नुसते अंदाज दिले जातात पण स्वतः राणीने त्या संदर्भातली माहिती कधीच सार्वजनिक केलेली नाही. गुडटू वेबसाईटच्या रिपोर्टनुसार महाराणीची संपत्ती ३६५ दशलक्ष पौंड म्हणजे ३३.३६ अब्ज रुपये आहे. सोव्हरिंग ग्रँड राणीला दरवर्षी सरकारकडून दिली जाते तर प्रिवी पर्स म्हणजे राणीची खासगी कमाई. यात करदात्यांच्या पैशाचा समावेश नसतो. असे म्हणतात टॉवर ऑफ लंडन, बकिंघम पॅलेस, विंडसर कॅसलला भेट देणाऱ्या लोकांकडून घेतला जाणारा पैसा राणीचा असतो. पण काही लोकांच्या म्हणण्यानुसार हे खरे नाही. यातून होणारा महसूल रॉयल कलेक्शनच्या देखभालीसाठी खर्च होतो.

राजपरिवाराची लंडन शिवाय स्कॉटलंड, वेल्श, आयरलंड येथे मालमत्ता आहे. ही मालमत्ता विकली जाऊ शकत नाही. या शिवाय अनेक अमुल्य कलाकृती, हिरे, दागिने, कार्स, शाही स्टँप कलेक्शन, घोडे अश्या अनेक वस्तू राणीच्या मालकीच्या आहेत. रॉयल कलेक्शन मध्ये १० लाख वस्तू असून त्यांची किंमत १० खरब आहे.