‘जम्मू काश्मीर एलओसी’ वरील जवानांचे सच्चे मित्र- गद्दी श्वान

काश्मीरच्या स्थानिक प्रजातीचे कुत्रे जम्मू काश्मीर एलओसी वर भारतीय सेना जवानाचे सच्चे मित्र म्हणून कामगिरी पार पाडत आहेत. गद्दी जातीची ही कुत्री कोणत्याही विशेष प्रशिक्षणाशिवाय संशयास्पद अश्या कोणत्याही बारीक हालचाली अचूक टिपून जवानांना सावध करत आहेत. विशेषतः घुसखोरी सारख्या प्रकारात या श्वानांची मदत अमुल्य ठरत असल्याचे समजते.

आपल्याकडे ज्याप्रमाणे मेंढपाळ कुत्री असतात तशीच काश्मीर मधील ही स्थानिक कुत्री मेंढपाळच पाळतात. मेंढ्या, बकऱ्यांचे शिकाऱ्यांपासून रक्षण व्हावे म्हणून ही कुत्री मेंढपाळ पाळतात. त्यांना हिमालयन शिप डॉग असे म्हटले जाते. भोरीया, बंगारा अशीही त्यांची ओळख आहे. पूर्व नेपाल आणि हिमालय पायथा भागात ही जमात सापडते. पशुधन संरक्षक म्हणून ती पाळली जातात.

एलओसीवरील सेना अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कुत्री भटकी नाहीत तर स्थानिक आहेत. सीमेवर गस्त आणि रखवाली मध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. सीमेवर अनेक ठिकाणी सेना, मशिनरी, उपकरणे यांच्या सहाय्याने २४ तास निगराणी ठेवते. अनेक ठिकाणी कुंपण घातले गेले आहे. तरी घुसखोरीचा विषय येतो तेव्हा गद्दी कुत्री अधिक विश्वासार्ह ठरतात असा अनुभव आहे. किंचित जरी हालचाल दिसली तरी त्वरित ही कुत्री जवानांना सावध करतात. ही कुत्री म्हणजे जवानांचे जणू कान आणि डोळेच आहेत. त्यामुळे जवान कुटुंबातील घटकाप्रमाणे त्यांचा प्रेमाने सांभाळ करतात. कडाक्याच्या थंडीत सुद्धा गद्दी डॉग सैनिकांबरोबर चौकीत राहतात.

ही कुत्री स्थानिक लोकांना बरोबर ओळखतात आणि अपरिचित कुणी दिसले तर भुंकतात. शिवाय सीमेवर गस्त घालताना येणाऱ्या मानसिक ताणाचा निचरा करण्यासाठी सुद्धा या कुत्र्यांचा मोठा उपयोग होतो. यांच्या बरोबर जवान खेळतात त्यामुळे ताण कमी होतो. ही कुत्री सैनिकांचे चांगले मनोरंजन करतात. त्यांचे प्रशिक्षण आणि देखभाल अगदी सोपी जाते आणि त्यांना पाळण्यासाठी येणारा खर्च कमी आहे. त्यामुळे जवानांचे खरे मित्र म्हणून ती लोकप्रिय आहेत.