कामगार टंचाईने हे देश झाले हैराण

कोविड १९ ने सर्व जगभर जे विविध प्रतिकूल परिणाम घडविले त्यातील एक म्हणजे जगभरात निर्माण झालेली कर्मचारी टंचाई. कोविड प्रतिबंध उठविले गेल्यापासून अनेक देशात प्रचंड प्रमाणावर राजीनामे देण्याचे जे सत्र सुरु झाले ते अजून सुरूच राहिले आहे. परिणामी अनेक देशांना कर्मचाऱ्यांची चणचण जाणवू लागली आहे. जर्मनी मध्ये प्लंबरची चणचण आहे, अमेरिकेत पोस्टल सेवा कर्मचारी व अन्य सेवा कर्मचारी हवे आहेत तर ऑस्ट्रेलियात इंजिनिअर्स, कॅनडा मध्ये हॉस्पिटलमध्ये नर्स हव्या आहेत.

एएफपीच्या बातमीनुसार कर्मचारी नाहीत असे नाही पण त्या त्या क्षेत्रासाठी योग्य कर्मचारी मिळविणे हे कसरतीचे काम झाले आहे. जर्मनी युरोपातील मोठी अर्थव्यवस्था आहे पण यंदा गतवर्षीच्या तुलनेत कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या जागा १,०८,००० ने अधिक आहेत. अमेरिकेत परिस्थिती आणखी बिकट असून रेस्टॉरंट व अन्य व्यवसायात ‘हेल्प वॉटेड’ अशी पोस्टर्स जागोजागी दिसत आहेत. जुलै अखेर १.१ कोटी जागा रिकाम्या आहेत. म्हणजे ज्याला नोकरी हवी त्याला एकावेळी दोन नोकऱ्या मिळतील अशी परिस्थिती आहे.

रिसर्च फर्म कॅपिटल इकॉनॉमी नुसार जगभरातच नोकरदार मिळविणे अवघड झाले आहे. प. युरोप, उ.अमेरिका येथे परिस्थिती जास्त कठीण आहे. पूर्व युरोप, तुर्कस्तान, लॅटीन अमेरिका येथेही हीच परीस्थिती आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे जगाची अर्थव्यवस्था मंदावली आहे तरी नोकरदार मिळत नाहीत ही अद्भुत परिस्थिती आहे. या मागचे कारण असे सांगितले जात आहे की वरील देशात तरुण संख्या कमी आहे त्यामुळे तसेही कर्मचारी कमीच आहेत. कोविड मुळे वाढत्या वयाच्या अनेकांनी निवृत्तीचे वय होण्याअगोदर नोकऱ्या सोडल्या आहेत तर अनेकांना अजूनही लाँग कोविड इफेक्टचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बहुतेक लोक राजीनामा देण्यास प्राधान्य देत आहेत. कंपन्या पगारवाढ, घरून काम, बोनस, सुट्ट्या अशी अनेक प्रलोभने दाखवीत असून सुद्धा नोकरदार मिळणे अवघड झाल्याचे सांगितले जात आहे.