असे आहे ‘ लंडन ब्रिज इज डाऊन’ कोडचे रहस्य
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर लगोलग सत्ता हस्तांतरण योजनेची अंमलबजावणी सुरु झाली असून या पूर्ण योजनेला ‘लंडन ब्रिज डाऊन’ असे कोडनेम दिले गेले आहे. गेली अनेक वर्षे या कोडनेम बाबत गुप्तता पाळली गेली होती मात्र आता या रहस्यमयी कोडनेम बाबत अनेक बाबी समोर आल्या आहेत. दीर्घ आजारानंतर आणि ७० वर्षे सत्ता भोगल्यानंतर राणीचे ९६ व्या वर्षी निधन झाले आहे.
वरील कोड नेम नियमानुसार राणीच्या निधनानंतर लगोलग एका खास अधिकाऱ्याने ब्रिटनच्या पंतप्रधान लीज ट्रस यांना एका अत्यंत खासगी फोन वरून राणीच्या निधनाची माहिती दिली त्यावेळी राणीचे निधन हे शब्द न उच्चारता ‘लंडन ब्रिज ईज डाऊन’ हे शब्द उच्चारले गेले. नंतर प्रेस असोसिएशन तर्फे वायरवर राणीच्या निधनाची घोषणा झाली आणि पूर्ण राजपरिवार तयारीला लागला. राणीचे डोळे बंद केले गेले आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या नावाची नवा राजा म्हणून घोषणा केली गेली. ब्रिटन मध्ये सत्ता हस्तांतरण खबर राणीचे खासगी सचिव सर क्रिस्टोफर गाईडेट यांनी पंतप्रधान लीज यांना एका सुरक्षित फोनवरून दिली आणि नंतर सर्व राजदूत, गव्हर्नर जनरल यांना नियमानुसार ही बातमी दिली गेली.
बकिंघम पॅलेसच्या दरवाज्यावर शोक दर्शक कपडे घालून एका सेवकाने राणीच्या निधनाची नोटीस लावली. राजमहालाच्या वेबसाईटवर डार्क बॅकराउंडवर हाच संदेश दिला जातो. सर्व न्यूजरीडरनी ब्लॅक सूट आणि ब्लॅक टाय लावून न्यूज दिल्या आणि सर्व सरकारी कार्यक्रम थांबविले गेले. सर्व सरकारी वेबसाईटवर काळे बॅनर्स लावले गेले.
महाराणी एलीझाबेथ यांच्यावर १० दिवसांनी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. लंडन ब्रिज कोडनेम नुसार त्यानंतर पंतप्रधान पहिले भाषण देतील तोपर्यंत कुणीही काहीही व्यक्तव्य करणार नाही. रक्षा मंत्रालयाकडून बंदूक सलामी दिली जाईल आणि संपूर्ण देशात एक मिनिट मौन पाळले जाईल. नंतर पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करतील.