स्टार बक्सच्या नरसिंहन यांना अडीच पट पगारवाढ

मूळचे भारतीय, लक्ष्मण नरसिंहन जगातील बलाढ्य कॉफी सिरीज स्टार बक्सचे नवे सीईओ म्हणून सूत्रे हाती घेत असल्याची घोषणा गुरुवारी कंपनीने केली आहे. नव्या पदावर येताना नरसिंहन यांना पूर्वीच्या कंपनीत जो पगार दिला जात होता त्यात आता अडीच पटीने वाढ झाली आहे. नरसिंहन या पूर्वी रेकीटचे सीईओ होते आणि त्यांना तेथे वर्षाला ५५ कोटी रुपये पगार होता. स्टार बक्स मध्ये त्यांना वर्षाला १४० कोटी रूपये म्हणजे महिना ११ कोटींपेक्षा जास्त पगार मिळणार आहे.

नरसिंहन यांना या क्षेत्रातील सुमारे तीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी पेप्सिको मध्येही महत्वाच्या पदावर काम केले आहे. मॅकेंझी मध्येही ते सिनियर पार्टनर होते. गार्डियनच्या रिपोर्ट नुसार रेकीट आणि स्टारबक्स या कंपन्यांच्या मूल्यात मोठा फरक आहे. त्यामुळे नरसिंहन यांना इंसेन्टीव्ह सुद्धा अधिक मिळणार आहे. नरसिंहन यांनी रेकीटची सूत्रे हाती घेतली आणि कंपनीचे भरभराट वेगाने झाली. त्यामुळे नरसिंहन यांनी कंपनी सोडताच कंपनीचा शेअर ४ टक्के घसरला आहे.

स्टारबक्स सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. अमेरिकेतील कंपनीच्या २०० स्टोर्स मध्ये कर्मचारी युनियन झाल्या असून त्यांनी महागाई वाढल्याने पगार वाढीची मागणी केली आहे. करोना मुळे चीन मधील कंपनीचा व्यापार जवळ जवळ ठप्प आहे. त्यामुळे कंपनीला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे मोठे काम नरसिंहन यांना करावे लागणार आहे.