जगातील या देशात हायवेंवर अशी आहे स्पीड लिमिट

अहमदाबाद मुंबई हायवेवर झालेल्या कार अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा एक्स्प्रेस वे, हायवे वर स्पीड लिमिट किती असावे, बेल्ट नियम या विषयीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भारतात एक्स्प्रेस वे आणि हायवेवर वेग मर्यादा बहुतेक ठिकाणी ताशी १०० किमी तर अगदी थोड्या ठिकाणी १२० किमी आहे. राज्यमार्गावर हीच मर्यादा ताशी ८० किमी तर शहरी रस्त्यांवर ताशी ४० ते ६० किमी आहे. तरीही भारतात रस्ते अपघातांचे आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे.

जगातील अनेक विकसित देशांचा विचार या संदर्भात केला तर सर्वात परिपूर्ण रस्ते असलेल्या स्वीडन मध्ये हीच मर्यादा ताशी १२० किमी आहे. येथील रस्त्यांचे डिझाईनच असे आहे ज्यामुळे रस्ते अपघात कमी होतात आणि अपघात मृत्यूंचे प्रमाण पण खूप कमी आहे. अमेरिकेतील रस्ते लांब रुंद आहेत पण तेथे रस्ते अपघाताचे प्रमाण जास्त आहे. येथेही कमाल वेग मर्यादा ताशी १२० किमी आहे. तर वेगाचे वेड असलेल्या नेदरलंड मधील ७० टक्के रस्त्यावर वेग मर्यादा ताशी १३० किमी आहे. अर्थात बहुतेक सर्व देशात हायवे, राजमार्ग आणि शहरी मार्ग यांच्यासाठी वेग मर्यादा वेगवेगळ्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात हायवे वर स्पीड मर्यादा नव्हती पण तेथे अपघात वाढल्यावर आता ही मर्यादा ताशी १३० किमी ठरवली गेली आहे. बुल्गारीयातील रस्ते फार बिझी आहेत पण येथे वेगळे फास्ट रोड आहेत तेथे काही ठिकाणी ताशी १२० तर काही ठिकाणी ताशी १३० ते १४० वेग मर्यादा आहे. पोलंड आणि ऑस्ट्रिया येथे हीच मर्यादा ताशी १३० किमी आहे.

फ्रांस मधील रस्ते उत्तम आहेत. येथेही कमाल वेग मर्यादा ताशी १३० किमी होती. पण रस्ते अपघात वाढल्याने नियमात बदल करण्याची मागणी केली गेली. आता येथे वेगळे स्पीड वे बनविले गेले असून बाकी ठिकाणी वेग मर्यादा ताशी ८० ते ९० किमी आहे. हंगेरी येथे हीच मर्यादा ताशी १३० किमी आहे. मात्र येथे सीट बेल्ट बंधनकारक असून अन्यथा दंड केला जातो. लाग्झंबर्ग मध्ये वेग मर्यादा ताशी १३० किमी असली तरी पाऊस असेल तर ती ११० किमी वर येते.