अमेरिकेत दरवर्षी घ्यावा लागणार करोना लस डोस

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी कोविड पासून बचावासाठी दरवर्षी फ्ल्यू प्रमाणेच लसीचा एक डोस नागरिकांना घेता येईल अशी घोषणा केली आहे. अमेरिकेच्या लसीकरण योजनेत करोना लसचा समावेश केला गेला आहे. या आठवड्यापासून हजारो फार्मसी, डॉक्टर्सचे दवाखाने, सार्वजनिक आरोग्य केंद्रे व अन्य स्थानांवर १२ वर्षे व त्यापुढील सर्व व्यक्तींना करोना लस मिळू शकेल असेही जाहीर केले गेले आहे.

अमेरिकेत कोविडपासून बचावासाठी सर्व प्रकारची उपाययोजना केली जात आहे. त्यात दरवर्षी कोविड १९ लसीचा डोस हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. करोनाच्या नव्या व्हेरीयंट पासून बचावासाठी बुस्टर डोस घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. अमेरिकेत दरवर्षी फ्ल्यू लसीचा एक डोस दिला जातो तसेच हालोविन पर्यंत नागरिकांनी करोना लस डोस घ्यावा असे आवाहन केले गेले आहे. अमेरिकन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेल्याचे समजते.

व्हाईट हाउस मधील कोविड रीस्पॉन्स टीमचे को ऑर्डीनेटर आशिष झा म्हणाले, अमेरिकेतील मोठ्या समुदायाला दरवर्षी कोविड शॉट योजनेमुळे पूर्ण वर्षभर गंभीर आजारा विरुद्ध लढण्यासाठी हाय लेव्हल सुरक्षा मिळणार आहे. हा लसीकरण मोहिमेतील मैलाचा दगड ठरेल. जॉन हापकीन युनिव्हर्सिटीच्या आकडेवारी नुसार अमेरिकेत आतापर्यंत करोनाच्या ९ कोटी ४८ लाख ८० हजार ७०१ केसेस असून १०,४८,१३४ मृत्यू झाले आहेत.