सायकल चोऱ्यांमुळे मुंबईचे डबेवाले त्रस्त, फडणवीसांना लिहिले पत्र

मुंबईची जीवनरेखा बनलेले डबेवाले आजकाल होत असलेल्या सायकल चोऱ्यांमुळे जेरीस आले आहेत. या संदर्भात आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सायकल स्टँड परिसरात गस्त वाढविण्याची विनंती केली आहे. या संदर्भात रेल्वे स्टेशन बाहेर पार्क केलेल्या डबेवाल्यांच्या सायकली चोरीस जाण्याचे प्रमाण खूप वाढल्याचे व त्यातही विलेपार्ले, नालासोपारा आणि बोरीवली भागात हा त्रास खूप असल्याचे नमूद केले गेले आहे. करोना मुळे डबेवाल्यांना अगोदरच खूप नुकसान सोसावे लागले आहे त्यात आता सायकल चोऱ्यांची भर पडल्याने हे नुकसान सोसणे अशक्य बनल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर या संदर्भात बोलताना म्हणाले, डबेवाल्यांचे ये-जा करण्याचे मुख्य साधन सायकल हेच आहे. आजकाल सायकली महाग आहेत. जरा बरी सायकल १० हजाराच्या खाली येत नाही. सायकली मोठ्या प्रमाणावर चोरीला जात आहेत आणि त्यामुळे आमच्या रोजच्या कामात अडचणी येत आहेत परिणामी कमाईवर परिणाम होत आहे. स्वयंसेवी संस्थांकडून सायकली मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहे. मुंबई शहरात ५ हजाराहून अधिक डबेवाले आहेत आणि मुंबईच्या विविध कार्यालयात रोज सरासरी २ लाख डबे वेळच्या वेळी पोहोचवले जातात.

मुंबई डबेवाल्यांच्या शिस्तशीर, बिनचूक काम प्रणालीची जागतिक व्यवस्थापन तज्ञांनी दखल घेतली आहे. अनेक प्रसिद्ध व्यवस्थापन संस्थात डबेवाले आणि त्यांचे व्यवस्थापन या विषयी आवर्जून शिकविले जाते. १८९० मध्ये सुरु झालेला हा व्यवसाय आजही अखंड कार्यरत आहे. या डबेवाला संघटनेला अनेक सन्मान मिळाले असून ब्रिटीश राजघराण्यात त्यांनी दिलेल्या गिफ्ट संग्रहालयात सांभाळून ठेवल्या गेल्या आहेत.