ICC T20 Rankings : बाबर आझमची राजवट संपली, मोहम्मद रिझवान बनला नंबर वन फलंदाज


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या T20 क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. पाकिस्तानचा स्टार खेळाडू मोहम्मद रिझवान आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. रिझवानने आपल्याच संघाचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत हे स्थान गाठले. भारताच्या सूर्यकुमार यादवनेही ताज्या क्रमवारीत निराशा केली आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 1000 दिवसांपेक्षा जास्त दिवस टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला. मात्र टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या शेवटच्या 10 डावांमध्ये बाबर आझमला केवळ दोन अर्धशतके झळकावता आली. आशिया चषकाच्या तीन डावात बाबर आझमची बॅट सपशेल अपयशी ठरली. याचा फटका बाबरला सहन करावा लागला आणि टी-20 क्रमवारीत त्याची सत्ता गमवावी लागली.

दुसरीकडे मोहम्मद रिझवानने आशिया चषकात जबरदस्त खेळ दाखवला आहे. रिझवानने आशिया चषकाच्या तीन डावात 192 धावा केल्या आहेत. रिझवानने हाँगकाँगविरुद्ध नाबाद 78 धावांची खेळी केली. यानंतर रिझवानने भारताविरुद्ध 71 धावांची खेळी केली आणि आपल्या संघाचे अंतिम फेरीत स्थान जवळपास निश्चित केले. या खेळींचा फायदा रिझवानलाही झाला आणि तो टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू बनला.

रोहित शर्माला झाला याचा फायदा
रिजवान हा पाकिस्तानचा तिसरा खेळाडू आहे, जो टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. याआधी मिसबाह-उल-हक आणि बाबर आझम हे टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचे फलंदाज ठरले आहेत. बाबर आझम 1155 दिवस टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला.

भारताच्या सूर्यकुमार यादवला आशिया चषकाच्या चार डावांत केवळ एक अर्धशतक झळकावता आले, त्यामुळे तो पूर्वीप्रमाणेच चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा मार्कराम तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान पूर्वीप्रमाणेच पाचव्या क्रमांकावर कायम आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला तीन स्थानांचा फायदा झाला असून तो 14व्या स्थानावर आला आहे.