लीज ट्रस यांना मिळणार इतका पगार, या आहेत जबाबदाऱ्या

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लीज ट्रस यांनी पदाची सूत्रे महाराणी एलिझाबेथ यांच्या कडून स्वीकारली आहेत. ब्रिटनची ढासळती अर्थव्यवस्था मार्गावर आणणे, कर कपात, वीज खर्च कमी करणे आणि महागाईवर नियंत्रण ही लीज यांच्या समोरची मुख्य आव्हाने आहेत. ब्रिटीश पंतप्रधानांना किती पगार मिळतो, त्यांचे अधिकार कोणते आणि त्याच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या असतात यांची माहिती या निमित्ताने करून घेणे योग्य आहे.

ब्रिटीश पंतप्रधानांना अधिकृत निवासस्थान मिळते. १० डाउनिंग स्ट्रीट असा या घराचा पत्ता असून येथेच त्यांचे कार्यालय असते. १७३५ पासून हेच अधिकृत पंतप्रधान निवासस्थान आहे. मात्र माजी पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी ११ डाउनिंग स्ट्रीट या घरात मुक्काम केला होता. हा बंगला अधिक मोठा आहे. ब्रिटीश पंतप्रधानांना १,६४,०८० पौंड पगार मिळतो. रुपयात ही रक्कम १,५०,५८,५१६ रूपये आहे. त्यातील ७७,२२,३५४ लाख खासदार वेतन म्हणून तर ७३,३६,१६२ पंतप्रधान म्हणून मिळतात. बोरिस जोन्सन फक्त पंतप्रधान वेतनच घेत होते असे समजते.

ब्रिटीश पंतप्रधानाची नेमणूक महाराणी करते. पंतप्रधान ब्रिटीश सरकारचा नेता असतो, निवडणूक जिंकून आलेला पक्ष त्याचा नेता ठरवितो. पण बोरिस यांनी मुदतीपूर्वी पद सोडल्याने कॉन्झर्वेटीव्ह पार्टीने बहुमताने नेता निवड केली. यात फक्त पक्षाच्या सदस्यांनी मतदान केले.

सरकार जी धोरणे राबवेल त्याची सर्व जबाबदारी पंतप्रधानावर असते. तसेच घेतलेल्या निर्णयांना पंतप्रधान जबाबदार असतात. तेच मंत्र्यांच्या नेमणुका करतात तसेच मंत्र्यांना कधीही काढून टाकण्याचा अधिकार त्यांना असतो. कर आणि खर्च धोरणे यावर त्यांचे नियंत्रण असते. तसेच पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री नवे कायदे आणू शकतात.