आता दर महिन्यालाच होणार करोना संसर्ग?

करोनाच्या ओमिक्रोनचे नवे व्हेरीयंट बीए.५ संदर्भात अमेरिकन एक्स्पर्टनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लोकांना दर महिन्यात एकदा करोना संसर्ग होणारच आहे. ओमिक्रोन बीए.५ या व्हेरीयंटचा बारकाईने अभ्यास केल्यावर हा दावा केला गेला आहे.

२०१९ पासून जगात करोना आतंक सुरु आहे. त्यामुळे आजही अनेक देशात लॉकडाऊन लागले असून जगभरात मोठ्या प्रमाणावर अकाली मृत्यू झाले आहेत. यामुळे मानवी जीवन अनेक वर्षे मागे गेले आहे. करोना वरच्या लसी आल्या असल्या तरी त्यांच्या यशस्वीपणावर प्रश्नचिन्ह लागले आहे. करोना विषाणू वारंवार रूप बदलत आहे आणि एका स्वरुपावर नियंत्रण आले असे वाटत असतानाचा नवे व्हेरीयंट समोर येत आहेत. ओमिक्रोनचे बीए.५ हे व्हेरीयंट अतिशय वेगाने फैलावले आणि त्यामुळे त्यावर संशोधन सुरु आहे.

या संशोधनातून निघालेल्या निष्कर्षानुसार संशोधकांचा असा दावा आहे की, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी महिन्यातून एकदा तुमचा करोना चाचणी अहवाल पॉझीटिव्ह येणारच आहे. म्हणजे दर महिन्यात एकदा तुम्हाला करोना होणार आहे. आरोग्य तज्ञांच्या मते हे नवे व्हेरीयंट करोनाच्या अन्य व्हेरीयंटच्या तुलनेत फार चटकन संसर्ग होणारे आहे. पूर्वी एखाद्याला एकदा करोना झाला तर त्याला इम्युनिटी मिळत होती मात्र आता तसे होताना दिसत नाही. हा व्हायरस चार आठवड्यात पुन्हा त्याच व्यक्तीला संक्रमित करतो आहे. विशेष म्हणंजे पूर्ण लसीकरण झालेल्यांना सुद्धा त्याचा संसर्ग होत आहे. पण त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे हा संसर्ग जीवघेणा नाही. त्याच्यामुळे जीवाला फारसा धोका नाही.

या संसर्गाची लक्षणे फ्ल्यू प्रमाणे आहेत. चार दिवसात त्यापासून आराम मिळतो आहे. पण पुन्हा महिन्याभरातच त्याची लागण होण्याची शक्यता मोठी आहे असेही सांगितले जात आहे.