रवींद्र जडेजाने दिली शस्त्रक्रियेची माहिती

आशिया कप २०२२ मध्ये रवींद्र जडेजा जखमी झाला आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला असतानाचा रवींद्र जडेजा याने इन्स्टाग्रामवर त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती देऊन फोटो शेअर केला आहे. ऑलराउंडर जडेजा आशिया कप मध्ये दोन सामने खेळला असून दोन्ही मध्ये त्याची कामगिरी सरस झाली आहे. मात्र सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या घोट्याला दुखापत झाल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. स्पर्धेतील उर्वरित सामने तो खेळू शकणार नाही असे समजते. टी २० वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची घोषणा लवकरच केली जाणार आहे त्यात तरी त्याला समाविष्ट केले जाईल का याबाबत सध्या काहीच सांगता येणार नाही असे समजते.

जडेजाने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये, सर्जरी यशस्वी झाली, तुमच्या साऱ्यांच्या समर्थना बद्दल धन्यवाद. खूप जणांना धन्यवाद द्यायचे आहेत. बीसीसीआय, माझे सहकारी खेळाडू, सहयोगी स्टाफ, फ़िजिओ, डॉक्टर, चाहते सर्वानाच. रिहॅब लवकरच सुरु करतोय. शक्यतो लवकर मैदानावर परतेन’ असे जडेजाने लिहिले आहे.

रिपोर्ट नुसार या दुखापतीतून पूर्ण बरे होण्यास जडेजाला तीन महिने लागणार आहेत. सध्या जडेजाच्या जागी ऑलराउंडर अक्षर पटेल याची निवड टीम इंडिया मध्ये केली गेली आहे. जडेजाने या स्पर्धेत पाक विरुद्ध सामन्यात २९ चेंडू मध्ये ३५ रन्स आणि हॉंगकॉंग विरुद्ध सामन्यात ४ ओव्हर मध्ये १५ रन्स,१ विकेट अशी कामगिरी केली आहे.