मोदींचा वाढदिवस यंदा आफ्रिकन चित्त्यांच्या सहवासात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यंदाचा वाढदिवस आफ्रिकन चित्त्यांच्या सहवासात साजरा होणार आहे. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मध्यप्रदेशातील कुनो पालपूर अभयारण्यात उपस्थित राहणार असून याच दिवशी आफ्रिकेच्या नामिबिया येथून भारतात आणले जात असलेले चित्ते अभयारण्यात सोडण्याच्या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी मंगळवारी कॅबिनेट मध्ये त्यांच्या मंत्र्यांना ही माहिती दिली. मध्यप्रदेश कडून पंतप्रधानांना वाढदिवसाची ही अनोखी भेट दिली जात आहे.
कुनो अभयारण्यात चित्त्यांच्या प्रवेशाची तयारी पूर्ण झाली आहे. नामिबिया मधून चार नर आणि चार मादा चित्ते जोहान्सबर्ग येथून विमानाने दिल्लीला आणले जात असून नंतर दिल्लीहून हे चित्ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मधून कुना येथे आणले जाणार आहेत. द. आफ्रिकेतील चित्ता तज्ञांची चार लोकांची एक समिती कुनो पालपूर येथे पोहोचली आहे. हे तज्ञ येथे दोन दिवस राहून चित्ते अभयारण्यात सोडण्याच्या तयारीची पाहणी करणार आहेत. त्यांच्या अहवालानंतर द. आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात येणार आहेत असे समजते.
चित्ते अभयारण्य प्रवेश मोहीम उद्घाटनाला उपस्थित राहणाऱ्या अतिविशेष पाहुण्यांच्या आगमनासाठी विशेष सुविधा तयार केली गेली असून चार हेलिपॅड बांधली गेली आहेत. तसेच सुमारे १५ किमीचा रस्ता युध्दपातळीवर तयार करण्याचे काम सुरु असल्याचे समजते.