अमेरिकेत एक तासात बांधली जाताहेत स्वस्त घरे

अमेरिकेत सध्या महागाईचा उद्रेक झाला आहे. त्याचा थेट परिणाम घरांच्या किमती वाढण्यात झाला असून आता मध्यमवर्गीयांना घर घेणे जवळ जवळ अशक्य बनले आहे. त्याला एका तासात बांधल्या जाणाऱ्या स्वस्त घरांचा पर्याय ‘बॉक्सेबल’ नावाच्या स्टार्टअपने उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क सध्या याच टाईपच्या घरात मुक्काम टाकून आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत २०२० मध्ये २.६२ कोटींना मिळणारे घर महागाईमुळे ३० टक्के किंमत वाढल्याने ३.४२ कोटींना मिळते आहे. बॉक्सेबल कंपनी ४३.५० लाखांपासून ८० लाख किमतीच्या रेंज मधील घरे उपलब्ध करून देत आहे. लास वेगास मधील ही कंपनी २०१७ मध्ये पाओलो तीर्मानी यांनी स्थापन केली तेव्हा त्यांनी ‘दर मिनिटाला एक घर’ असे लक्ष्य ठेवले होते. सध्या ते एक तासात एक घर तयार करत आहेत. एका तासात उभारल्या जाणाऱ्या या घरात अनेक सोयी आहेत. त्यात किचन, बेडरूम्स, लिव्हिंग रूम, बाथरूम्स अश्या सर्व सोयी आहेत.

या प्रकारच्या घरांना कॅसिटा हाउस असे म्हटले जाते. कॅसिटा या स्पॅनिश शब्दाचा अर्थच मुळी छोटे घर असा आहे. या घरांना ‘इन –लॉज सूट’ असेही म्हटले जाते. म्हणजे एकाच आवारात मुख्य मोठ्या घरापासून वेगळा उभारलेला लिव्हिंग एरीया. याची मुख्य संकल्पना म्हणजे घरात ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांना एकत्र कुटुंबात राहण्यापेक्षा म्हटले तर जवळ आणि म्हटले तर स्वतंत्र अशी सुविधा देणारी घरे.