वाळकेश्वरमधील घरामधून आज सायरस मिस्री यांची अंत्ययात्रा

टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी पालोनाजी ग्रुपचे अध्यक्ष सायरस मिस्री यांची अंत्ययात्रा आज मुंबईतील त्यांच्या वाळकेश्वर मधील सी फेसिंग मॅन्शन मधून निघत असून वरळीच्या घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ४ सप्टेंबर रोजी अहमदाबाद मुंबई हायवे वर झालेल्या भीषण कार अपघातात सायरस यांचा मृत्यू झाला होता. गुजराथ मधील उदवाडा पारसी मंदिरातून दर्शन घेऊन मुंबईला परतत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार अपघातग्रस्त झाली त्यात सायरस आणि त्यांचे सहप्रवासी जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता.

सायरस यांचे लंडन, दुबई, पुणे, अलिबाग, माथेरान येथेही बंगले आहेत. पण मुंबईतील वाळकेश्वर येथील सी फेसिंग मॅन्शन त्यांचे विशेष आवडते होते. मुंबईत असत तेव्हा ते याच घरात राहत असत. सायरस आणि जहांगीर यांचे रविवारी रात्री उशिरा जे जे रुग्णालयात पोस्ट मार्टेम केले गेले तेव्हा शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्याने सायरस यांचा मृत्यू ओढवला असे निदान केले गेले आहे.

उदवाडा अग्नी मंदिराच्या पुजाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पालोन्जी यांच्या निधनानंतर सायरस यांनी या इरानशाह म्हणजे अग्नी मंदिराचा आणि धर्मशाळेचा जीर्णोद्धार केला. शापोराजी पालोनजी ग्रुप कडून पारसी समाजाच्या विकासासाठी सर्वाधिक दान दिले गेले आहे. या मंदिराच्या देखभालीचा सर्व खर्च याच ग्रुप कडून केला जातो. प्रत्येक कार्यक्रमापूर्वी मिस्री परिवार येथे येत असे, असेही हे पुजारी म्हणाले. त्यांनी सायरस यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.