लीज ट्रस बनल्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान म्हणून ४७ वर्षीय लीज ट्रस निवडणूक जिंकल्या आहेत. यांनी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव करून हा विजय मिळविला. त्या आता बोरिस जोन्सन यांची जागा घेतील. फायरब्रांड नेत्या अशी लीज यांची प्रतिमा आहे. त्यांच्या विजयाची घोषणा होताच लीज यांनी सुनक यांच्या संदर्भात, ‘इतका खोल विचार आणि समज असलेला नेता माझ्या पक्षात आहे हे माझे नशीब आहे’ असे उद्गार काढले आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा परिवार आणि सहकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत. मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांच्या नंतर लीज तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. मार्गारेट त्यांच्या आदर्श आहेत.

ऑक्सफर्ड येथे जन्म आणि शिक्षण झालेल्या लीज यांना पती हग ओ लॅरी आणि दोन कन्या यांचे मोठे पाठबळ आहे. ब्रिटन मिडीयाने लीज मोठ्या फरकाने विजयी होतील असे अंदाज दिले होते मात्र प्रत्यक्षात मतदानाचे आकडे पाहिले तर २००१ नंतर ६० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळालेल्या लीज ब्रिटनच्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या आहेत. त्यांना ५७ टक्के मते मिळाली आहेत तर सुनक यांना ४२.६ टक्के मते मिळाली आहेत. बोरिस यांना ६६.४ टक्के मते मिळाली होती. लहानपणापासून लीज यांना पराभवाचा तिटकारा आहे असे समजते.

६ सप्टेंबर म्हणजे आज बोरिस १० डाउनिंग स्ट्रीट येथे शेवटचे भाषण करतील आणि पदाचा राजीनामा देतील. मग स्कॉटलंड एबर्डीनशायर येथे महाराणी एलिझाबेथ यांना भेटण्यासाठी बोरिस आणि लीज जातील. बोरिस यांच्या राजीनाम्यानंतर लीज येथेच राणीला भेटतील. पारंपारिक पद्धतीने होणारा ‘किसिंग हँड’ सेरेमनी यंदा राणीची तब्येत ठीक नसल्याने प्रतीकात्मक स्वरुपात होईल आणि नंतर महाराणी बाल्मोरल कॅसल मध्ये लीज यांना पंतप्रधान पदाची शपथ देतील. लीज नंतर लंडनला परततील आणि १० डाउनिंग स्ट्रीट येथे पहिले भाषण करतील असे समजते. लंडन वेळेनुसार दुपारी चार वाजता हा समारोह होणार आहे.

या नंतर लीज त्यांच्या मंत्रीमंडळाची निवड करतील आणि बुधवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होईल असेही समजते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लीज ट्रस यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले असून भारत ब्रिटन संबध अधिक मजबूत बनतील अशी आशा व्यक्त केली आहे. नवीन भूमिका आणि जबाबदारी बद्दल मोदींनी लीज यांना शुभेच्छा दिल्या आहेत.