परदेशात नोंदणी झालेली वाहने भारतीय रस्त्यांवर चालविता येणार
परदेशातून येणारे प्रवासी आणि वाहनांसाठी केंद्र सरकारच्या परिवहन मंत्रालयाने नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार जे प्रवासी परदेशातून येताना त्यांची खासगी वाहने घेऊन येतील त्यांना भारतीय रस्त्यांवर त्यांची वाहने नवे नियम पाळून चालविता येणार आहेत. परदेशात नोंदणी झालेली वाहने सुद्धा येथे चालविता यावीत यासाठी रविवारी अन्य देशात नोंदणी झालेली खासगी वाहने भारतीय क्षेत्रात चालविण्याची परवानगी देणारा मोटार वाहन गैर परिवहन वाहन भारत यात्रा नियम २०२२ बनविला गेला आहे.
मात्र यासाठी अशी परवानगी मिळालेल्या वाहनांना एक अधिकृत रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वाहन चालकाजवळ अधिकृत वाहनचालक परवाना अथवा आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाना असणे बंधनकारक आहे. तसेच विमा पॉलिसी आणि पोल्युशन कंट्रोल सर्टिफिकेट हवे. नवे नियम बनविताना सुरक्षेला प्राधान्य दिले गेले आहे.
यापूर्वी अनेकदा विदेशी राजनैतिक पाहुणे भारतात येताना त्यांची स्वतःची खासगी वाहने घेऊन आले आहेत. पण त्यासाठी कोणतेही नियम नव्हते. आता त्यासाठी नव्याने नियमावली बनविली गेली आहे. त्यानुसार जारी झालेल्या आदेशानुसार वाहनाचे कागदपत्र इंग्रजी शिवाय अन्य भाषेत असतील तर भारतात येण्यापूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांकडून जारी केलेले इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले गेले आहे. ते प्रमाणित केलेले हवे. भारताशियाय अन्य देशात वाहन नोंदणी केली असेल तर स्थानिक प्रवासी अथवा सामान भारतीय हद्दीत आणणे अथवा घेऊन जाणे याला परवानगी नाही.